राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
लवकर वजन कमी करण्यासाठी अनेकजणं शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात. आपला लूक बदलण्यासाठी आणि हेल्दी दिसण्यासाठी शस्त्रक्रिया हा सोपा मार्ग असल्याचं वाटत असलं तरी हिच शस्त्रक्रिया तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. या एका शस्त्रक्रियेमुळे पुण्यातील एका इंजिनियर महिलेचं आयुष्य एका बेडपुरतं सीमित राहिलंय. जग फिरण्याचं, आनंदाने बागडण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या महिलेला आता एक पाऊलही टाकता येत नाहीये.
मस्त फिरायचं, भरभरुन जगायचं, आयुष्यावर भरपूर प्रेम करायचं... असं हॅपी गो लाईफ जगणाऱ्या उज्ज्वला कांबळेची आताची परिस्थिती पाहून कोणालाही धक्का बसेल. तिचे सगळे फोटो बघून ती किती हौशी आहेत, हे आपल्या अगदी सहज लक्षात येईल. उज्ज्वला कांबळे व्यवसायानं इंजिनिअर. खराडीमधील एका कंपनीत क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करायची. तिचं वार्षिक पॅकेज 30-32 लाखांच्या घरात होतं. आयटीतल्या एका जागी बसून कामामुळे लग्नानंतर तिचं वजन वाढत गेलं. 84 किलो वजन झाल्यावर वजन कमी करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. विविध पर्याय करून पाहिले. मात्र काही केल्या वजन कमी होत नव्हतं. शेवटी तिने लिपोसक्शन शस्त्रक्रियेबद्दल सर्च केलं. तिला लगेच शस्त्रक्रिया करायची नव्हती, मात्र फक्त चौकशी केल्यानंतर पुण्यातील या क्लिनिककडून वारंवार फोन येत होते. शेवटी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं असं त्याच्या पतीने सांगितलं.
16 ऑक्टोबर 2022 रोजी उज्ज्वला यांच्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटावरील साडेचार लिटर फॅट काढण्यात आलं होतं. पण शस्त्रक्रियेनंतर उज्ज्वला अत्यवस्थ झाली. या शस्त्रक्रियेनंतर उज्ज्वलाची भयंकर अवस्था झाली. यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रिया करताना भूल दिल्यानंतर नाडीचे ठोके, रक्तदाब कमी झाला होता. प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा झाली होती. त्यामुळे तिच्या मेंदूने काम करणंच बंद केलं होतं. उज्ज्वला गेली दोन वर्षे फक्त डोळ्यांची उघडझाप करते, मात्र काहीच बोलू शकत नाही.
उज्ज्वला यांचे पती बिरेंद्र कुमार मूळचे बिहारचे. पण जन्मापासून वर्ध्यात राहतात. उज्ज्वला आणि बिरेंद्र दोघेही एकाच ठिकाणी शिक्षण घेत होते. दोघेही इंजिनियर. उज्ज्वलाला जगवण्यासाठी बिरेंद्र कुमार शक्य ते सगळे प्रयत्न करतायत. घरातले सगळे दागदागिने, गाड्या विकून 70 लाख खर्च करुन उज्ज्वलावर खासगी रुग्णालयात उपचार केले. उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नाही. उज्ज्वलाचे 36 वर्षांचे पती बिरेंद्र कुमार शर्मा यांनी तिच्यावरील चुकीच्या उपचाराविरोधात लढा दिला. ससून रूग्णालयाने तपासणी करून चुकीच्या गोष्टी घडल्याचा अहवााल दिल्यावर डेक्कन पोलिसात डॉ. प्रशांत यादव आणि डॉ.स्वप्निल नागे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिरायला जायचंय ना? किती वेळ पडून राहणार....
उज्ज्वला आता कधीच फिरू शकणार नाही... कधीच बोलू शकणार नाही... मात्र तिचा पती बिरेंद्र तिच्यासाठी लढतोय. हसरं-खेळतं आयुष्य एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं. उज्ज्वलाला बोलता येत नाही आणि काही कळतंही नाही. मात्र तरीही तिचा पती तिच्याशी बोलतो. आपली बायको कधीच उभी राहू शकणार नाही हे डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी तो तिला धीर देतो. फिरायला जायचंय ना, किती वेळ पडून राहणार असं म्हणताना त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं.
वजन कमी झालं तर अधिक चांगलं आयुष्य जगता येईल अशी आशा बाळगून उज्ज्वला शस्त्रक्रियेसाठी त्या बेडवर झोपली खरी पण त्यानंतर ती कधीच उठू शकलेली नाही.