Maharashtra Rain Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवलेल्या शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र लवकरच मुसळधार पावसाचा अलर्ट असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.
येत्या दोन आठवड्यात महाराष्ट्रभरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याचं संदेश व्हायरल होत आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
येत्या २ आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून नागरिकांवरील टेन्शन कमी केलं आहे. पुढील दोन आठवड्यांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाच्या शक्यतेबाबत काही खोटे संदेश पसरवले जात आहेत. कृपया सतर्क राहा आणि हवामानाबाबतच्या IMD च्या सूचनांचे पालन करा. या अंदाजानुसार, १३ ते २० जुलै या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम घाट परिसरात मात्र तीव्र हवामानाच इशारा असून येथे मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.