
मराठीचे सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार सतीश दराडे (Ghazalkar Satish Darade) यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. 8 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. इतक्या कमी वयात त्यांनी घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी गझल क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची मराठी गझलांची अनेक पुस्तकं प्रदर्शित झाली आहेत.
सतीश दराडे बीड जिल्ह्यातील टोकवाडीचे असून पेशानं शिक्षक होते. पण त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली ते त्यांच्या गझलेनं. 'तुझे गाव अन् सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी', 'वारतो माणूस जेव्हा चांगला, अंतराळी एक तारा वाढतो इतकी समृद्ध जाणिवेची गझल' सतीश दराडेंच्या यांसारख्या अनेक गझला महाराष्ट्रभरात गाजल्या. घरंदाज गझल लिहिणाऱ्या सतीश दराडेंचं तरुण वयात निधन झाल्यानं साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सतीश दराडेंच्या काही गझला...
मागेच सर्व इच्छा गेल्या लयास माझ्या
हे एकमेव कारण भाग्योदयास माझ्या
होईल ती कळीही माझ्या बरोबरीची
थांबून ठेव काळा थोडे वयास माझ्या
---
धर्माला ग्लानी आली पापाने गंगा न्हाली
तुज यदायदाचा तरिही का श्लोक स्मरेना देवा
कोणाच्या सुखदु:खाचा मी गूढ उतारा आहे
वाचीत स्वतःला बसलो पण अर्थ कळेना देवा
आगीत तिच्या हृदयांच्या श्वासांच्या समिधा माझ्या
काळाच्या वार्यालाही हा यज्ञ विझेना देवा
---
श्वास घ्यायला फुरसत नाही
तरी जिंदगी उरकत नाही
सर्व चांदण्या मोजुन झाल्या
रात्र तरी का संपत नाही
मी वाऱ्याचा वारस आहे
मला दिशांची हरकत आहे
---
फाटकी कोणी दिली झोळी तुला
घे सुई घे... की हवी पोळी तुला
बोलली गर्भार, घेताना उडी
ही नदी नेईल आजोळी तुला
पाहिला संसार माझा जवळुनी
समजली आहेच रांगोळी तुला
---
मनाच्या खिन्न देठाचे कुणी नैराश्य खुडले तर
बघू तेव्हातरी काही सुगंधी शेर सुचले तर...
मला भिंतीमध्ये ऐसा रुजू देऊ नको देवा
तुझा तडकेल गाभारा ऋतुंनी कान भरले तर
---
कैदखान्याच्या छतावर
का बरे बसले कबूतर?
मी कसा झालो सुगंधी
धार्जिणा नव्हता ऋतू तर
मनगटांचा जाहला तह
मुंडकी नाराज यावर
पाय स्वप्नावर दिल्याने
डूख धरते झोपनंतर
दोन घोटांच्या तृषेची
गाजली चर्चा घसाभर
सांडले मी ऊन्ह माझे
डाग पडले सावलीवर..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world