जाहिरात

Farmer News: बळीराजाच्या कष्टाची क्रुर चेष्टा! 12 क्विंटल कांदा विकला, दमडीही मिळाली नाही, उलट पदरचे पैसे...

कांद्याचे पडलेले दर पाहता त्यांच्या पदरात कांदा विक्रीचे पैसे मिळणे तर लांबच, पण प्रकाश गलधर यांना आपल्या खिशातून 'एक रुपया' बाजार समितीला भरावा लागला. 

Farmer News: बळीराजाच्या कष्टाची क्रुर चेष्टा! 12 क्विंटल कांदा विकला, दमडीही मिळाली नाही, उलट पदरचे पैसे...

Chhatrapati Sambhajinagar Farmers News:  छत्रपती संभाजीनगरच्या पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या लिलाव शेतकऱ्यांसाठी जणू काळीज चिरणारा ठरतोय. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला फुटक्या दमडीचा भाव लागत नाहीये. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेय. याचा जळजळीत उदाहरण म्हणजे पैठण तालुक्यातील वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर.  प्रकाश गलधर यांनी १२ क्विंटल कांदा अत्यंत आशेने पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला. रक्ताचं पाणी करून पिकवलेला हा कांदा सोन्यासारखा भाव देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे पडलेले दर पाहता त्यांच्या पदरात कांदा विक्रीचे पैसे मिळणे तर लांबच, पण प्रकाश गलधर यांना आपल्या खिशातून 'एक रुपया' बाजार समितीला भरावा लागला. 

Tamil Nadu Politics: तामिळनाडूत पुन्हा निवडणुका लागणार? zoho सीईओंच्या ट्वीटची देशभरात चर्चा

बळीराजाच्या कष्टाची क्रुर चेष्टा.. 

ही घटना म्हणजे राज्यातील कृषी व्यवस्थेचा आणि कोसळलेल्या दरांचा जिवंत पुरावा आहे. ​हा केवळ एका शेतकऱ्याचा तोटा नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या संघर्षाचा अंत आहे. प्रकाश गलधर यांच्या पत्नीने दिवस-रात्र एक करून, थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता कांदा लागवडीसाठी कष्ट घेतले. घरात दोन मुलं शिक्षणासाठी धडपडत आहेत. मुलांच्या शिक्षणाची फी भरेल, संसाराचा गाडा हाकेल, या आशेवर ही पीक उभी होती. मात्र, आज जेव्हा हिशोबाची पावती हातात आली, तेव्हा कष्टाचे मोल शून्य झाले होते. ज्या हातांनी मातीतून सोनं उगवलं, त्याच हातांना आज स्वतःच्या खिशातून दंड भरण्याची वेळ आली आहे.

एकीकडे सरकार शेतीला नफा मिळवून देण्याच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष वास्तव हे आहे की कांदा उत्पादनासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. बी-बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यांचा मेळ लावताना शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. वरुडी गावाचा विचार केल्यास येथे २०० ते ३०० शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लावतात. दरवर्षी जवळपास ३० हजार क्विंटल कांद्याचे उत्पादन या गावातून घेतले जाते. पण बाजारपेठेत दर अशा प्रकारे कोसळले आहेत की, उत्पादन खर्च निघणे तर लांबच, साधी वाहतूक मजुरीही खिशातून द्यावी लागत आहे.

ही व्यथा फक्त एकट्या वरुडी गावातील शेतकऱ्यांची नाही. तर बाजार समितीमध्ये कांदा घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना याच संकटाचा सामना करावा लागतो.  कांद्याचे दर कोसळल्यामुळे संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी आज हवालदिल झाले आहे. त्यामुळे कष्टाचा मोबदला मिळत नसेल, तर बळीराजाने जगावे कसे, हा प्रश्न आता सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. 

Maval Tourism: सावधान! मावळात फिरायला जाताय? 4 महिन्यांत तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडतंय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com