बी-बियाणे, कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांची खैर नाही; व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या नंबरवर तक्रार करता येणार

कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनिय ठेवले जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक मुठाळ, मुंबई

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनिय ठेवले जाणार आहे.

राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर अशा विक्रेत्यांविरूद्ध तक्रारी ह्या दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. 

त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

मागील वर्षी देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबवला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला असून, 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे.
 

Advertisement