Agriculture news : वाशिममध्ये पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्राचा अवलंब, काय आहे ही पद्धत? 

खरीप हंगाम सुरू झाला असून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रांचा अवलंब करू लागले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

साजन डाबे, प्रतिनिधी

खरीप हंगाम सुरू झाला असून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रांचा अवलंब करू लागले आहेत. विशेषतः बीबीएफ म्हणजेच रुंद सरी वरंबा पद्धतीने शेतीची पेरणी करण्यावर भर दिला जात आहे. ही पद्धत कमी किंवा जास्त पावसाच्या परिस्थितीतसुद्धा पीक वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. मृदसंधारणाला चालना देत ही पद्धत पाण्याचे नियोजन सुलभ करते आणि त्यातून पीक उत्पादनात वाढ होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात बीबीएफ अर्थात रुंद सरी वरंबा या आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीच्या तयारीला लागले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करतांना साधारणतः दोन सरीमध्ये साडे सहा फुटाचे अंतर ठेवून मधील मोकळ्या जागेत पीक घेतले जाते. दोन्ही बाजूने सरी पडल्याने पावसाचे पाणी त्या सरीमध्ये झिरपून पिकांच्या वाढीसाठी हवे तेवढेच पाणी मिळते. त्यामुळे कमी पावसाळी परिस्थितीतही पिकांची चांगली वाढ होते. तसेच जास्त पाण्यातही या पध्दतीने पेरणी केलेल्या शेतातील पिकांना वाहून अथवा जळून जाण्याचा धोका उद्भवत नाही.

नक्की वाचा - Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही? कुठे तपासाल?

तसेच मृदसंधारण होण्यास मदत मिळते. रोपांमध्ये अंतर असल्याने पिकांना हवा आणि मुबलक असा सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे फलधारणा सुधारते. या आधुनिक पध्दतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करून आपली शेती सुरक्षित करावी असे आवाहन रुंद सरी वरंबा पद्धतीचे प्रचारक तथा प्रयोगशील शेतकरी दिलीप फुके यांनी केले आहे. या आधुनिक पेरणी पद्धतीचा अवलंब करून खरीप हंगामातील सोयाबिन, तूर, उडीद, मुग आदी पिकांच्या पेरणीसाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी तयारीला लागला आहे.

Topics mentioned in this article