
मनोज सातवी, प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील (Palghar Farm News) वाडा तालुक्यातल्या हमारापूर गावातील शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतीला रामराम ठोकून यांत्रिकी शेतीचा पर्याय निवडला आहे. मजुरांची टंचाई आणि वाढत्या शेती खर्चामुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात असताना, या प्रगतीशील शेतकऱ्याने यांत्रिकी शेतीचा यशस्वी प्रयोग करून इतरांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
सध्या पालघर जिल्ह्यासह राज्य भारत मजुरांची टंचाई, वाढता मजुरी खर्च आणि वेळेवर कामासाठी मजूर न मिळणे या सगळ्यांमुळे अनेक शेतकरी भात शेतीपासून दूर जात आहेत. मात्र, वाडा तालुक्यातील हमारापूर गावातले प्रगतिशील शेतकरी विनोद पाटील यांनी यंत्रसामुग्रीचा वापर करून शेतीचा नवा मार्ग शोधला आहे. या प्रक्रियेत (Traditional farming Vs Technical farming) ट्रान्सप्लांटर मशीन, ट्रॅक्टर-चलित रोटाव्हेटर, हार्वेस्टर अशा अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून त्यांनी शेतीत आधुनिकता आणली आहे. परिणामी, केवळ निम्म्या खर्चात उत्तम भात लागवड करत आहेत.
नक्की वाचा - Crop Competition 2025: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 16 पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर, 50 हजार रुपये जिंकण्याची संधी
सध्या राज्यभरात मजुरांची टंचाई आणि वाढती महागाई यामुळे भातशेतीला (Rice farming) फटका बसत आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यातील पालघर, वाडा, विक्रमगड, डहाणू, तालासरी, वसई आणि जव्हार मोखाडा या भागात सामान्यत: पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. परंतु शेतीची पारंपरिक पद्धत आर्थिक दृष्टिकोनातून परवडणारी राहिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीपासून दुरावत आहेत. शेत जमीन ओस पडत असताना विनोद पाटील या प्रगतिशील शेतकऱ्याने मात्र याला पर्याय शोधत यांत्रिकी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. विनोद यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी यांत्रिक साधनांचा वापर करत भात लागवड केली. त्यामुळे फक्त मजुरीचाच खर्च वाचवला नाही, तर वेळ आणि मेहनतही वाचवली आहे. शिवाय इतर शेतकऱ्यांना देखील ट्रान्सप्लांटर मशीनसह इतर साहित्य भाडे तत्ववार देऊन त्यांच्या शेतीची कामं करून देत असल्याने इतर शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे. पारंपरिक शेतीच्या तुलनेत निम्म्या खर्चात अधिक उत्पादन मिळवता येतं.
शेतीच्या या यांत्रिक पद्धतीमुळे खर्चही कमी झाला आणि वेळेचीही मोठी बचत झाली आहे. आता इतर शेतकरीही या आधुनिक शेतीला पाहून प्रेरित होत आहेत. शेतीची ही आधुनिक आणि नवी पद्धत शेती व्यवसायात एक नवा आशावाद घेऊन आली आहे. जर शासन स्तरावरून या नव्या आधुनिक शेतीला योग्य प्रोत्साहन मिळालं, तर राज्यातील शेतीला नवा आयाम मिळू शकतो. त्यामुळे शेती व्यवसायापासून दूर गेलेले शेतकरी आता पुन्हा शेती व्यवसायाकडे वळत आहेत हे खरं या आधुनिक शेतीचे फलित आहे .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world