Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे

Mumbai Coastal Road:  इंधन बचतीसोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये मुंबई कोस्टल रोड महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

Mumbai Coastal Road: मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्गावरील दक्षिणेकडील बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. इंधन बचतीसोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

(नक्की वाचा: Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला)

प्रकल्पामुळे होणारे फायदे

  • सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल. 
  • इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. 
  • ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. 
  • सुमारे 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. 
  • या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. 
  • या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. 
  • मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

(नक्की वाचा: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांची आवक घटल्याने दर कडाडले)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. 
  • या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. 
  • भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी 4.35 कि.मी. असून पुलांची एकूण लांबी 2.19 कि.मी.आहे. 
  • या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास 11 मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र 111 हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी 15.66 कि.मी. इतकी आहे. 
  • 7.5 कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. 
  • समुद्री लाटांपासून बचावासाठी 7.47 कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. 
  • या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये (Tunnel Feature)

  • बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे काँक्रीटचे अस्‍तर लावण्‍यात आलेले आहे. 
  • त्‍यावर अग्‍नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्‍नीरोधक फायरबोर्ड लावण्‍यात येत आहेत. 
  • भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून आपत्‍कालिन निर्वासनासाठी प्रत्‍येक 300 मीटरवर छेद बोगदे आहेत. 
  • उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्‍ये युटीलिटी बॉक्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. 
  • दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.
  • सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास 12.19 मी.) आहे. 
  • भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. 
  • तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. 
  • एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 
  • प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकवण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.

प्रकल्पाचा खर्च

मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च 13983.83 कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये 9383.74 कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

Advertisement

Mumbai Coastal Road | कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला; मरीन ड्राईव्ह ते हाजीअली अवघ्या 9 मिनिटात