
Maharashtra Shravan Somvar 2025: पवित्र श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार. श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांचा उत्साह आणि हरहर महादेवच्या घोषणांनी शिवमंदिरे गजबजून गेली आहेत. जाणून घ्या राज्यभरातील श्रावण सोमवारचा उत्साह.
भीमाशंकर येथे भाविकांची अलोट गर्दी:
आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी काल रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धो-धो पावसातही भक्तांनी हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमवला आहे.
डोंगराळ आणि जंगलवाटा पार करत, थेट पायी प्रवास करत अनेक भाविकांनी भीमाशंकरला हजेरी लावली. नैवेद्य, फुले, बेलपत्र खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेतही चांगलीच गर्दी झाली आहे. पावसामुळे वाटा ओल्या आणि काहीशा धोकादायक असल्या तरी श्रद्धेने ओतप्रोत झालेल्या भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे.
औंढा नागनाथला शंभूभक्तांची गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, काल मध्यरात्रीपासूनच भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले असून तर प्रभु नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत.. रात्री दोन वाजता हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी
आज पहिलाच श्रावण सोमवार असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक भाविक रात्रीच वेरूळमध्ये दाखल झाले होते, तर पहाटेपासून दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत व या पाचमधील तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. वेरूळचे श्री घृष्णेश्वर हे शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग होय. याचा उल्लेख शिवपुराण, रामायण, महाभारत, स्कंदपुराण आदी पुरातन ग्रंथामध्ये आढळतो. त्यामुळे श्रावण महिन्यात राज्यसह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात येत असतात.
श्री भुलेश्वर मंदिरामध्ये श्रावणी यात्रेला प्रारंभ..
पुण्याच्या पुरंदर तालुक्यात असलेल्या आणि स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण असलेल्या माळशिरस येथील श्री भुलेश्वर मंदिरामध्ये आजपासून श्रावणी यात्रा सुरू होत आहे. श्रावण यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येने भावीक या मंदिरात येऊन भुलेश्वराचे दर्शन घेत असतात. आज श्रावणातील पहिल्या सोमवारी पहाटे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सहपत्नीक मंदिरामध्ये शिवलिंगला अभिषेक करत महापूजा केली. श्रावणातील पहिल्याच सोमवार निमित्त मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे.
सोमेश्वर मंदिरात हर हर महादेवचा जयघोष
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या पिंपरी दुमाला येथील प्राचीन सोमेश्वर मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. इथे आज पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला. हेमाडपंथी शैलीतील दगडी बांधकाम असलेले हे ऐतिहासिक मंदिर भक्तांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. उपवास, अभिषेक आणि रुद्राभिषेक करत भाविकांनी श्रावण सोमवार साजरा केला.
बीडच्या परळी वैजनाथमध्ये लाखोंची गर्दी
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार या शुभ मुहूर्त आणि त्यातच परळी वैजनाथ… हजारो नव्हे, तर लाखो भाविकांची अलोट गर्दी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जमली आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात "हर हर महादेव" चा जयघोष घुमत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तीन स्वतंत्र दर्शन रांगा, मेडिकल टीम, वॉच टॉवर्स आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी स्वयंसेवकही तैनात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world