
Shravan 2025 Vrat Importance: हिंदू धर्मानुसार श्रावण महिना (Shravan 2025) अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. ज्या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास श्रवण नक्षत्र असते, त्यास श्रावण असे म्हटले जाते. आपल्या मराठी महिन्यांची नावे नक्षत्रांच्या नावावरुन ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व महिन्यांमध्ये भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे, असे म्हणतात. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराचे पूजन करणे अतिशय महत्त्वपूर्ण आणि फलदायी मानले जाते.
शिवपूजनाचे महत्त्व (Shravan Month 2025)
वेदमूर्ती नितीन जोशी गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे शिवपार्वतीचं माहात्म्य खूप आहे. कोणी शिवशक्ती तर गौरीहर तर कोणी उमा महेश्वर म्हणून पूजा करतात. विवाह प्रसंगी देखील गौरीहराची पूजा करण्याची परंपरा आहे. पार्वती महादेवासारखी प्रीती आजन्म राहावी, हा त्यामागील भावार्थ असतो. म्हणूनच विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे पहिले पाच वर्षे शिव मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावणी सोमवारी प्रातः काळी शिवमंदिरामध्ये जाऊन पूजा करून सांबशिवाला मूठभर धान्य वाहावे.
शिवामूठ वाहताना पुढील श्लोक म्हणावा
नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शुलिने |
शृकंगी भृंगी महाकालणयुक्ताय शंभवे ||
चातुर्मासातील पूजेमध्ये प्रामुख्याने पत्री वाहण्याची प्रथा आहे. जेणेकरून वनस्पतींची ओळख होणे, त्यांचे गुणधर्म समजून घेणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहाणे हे पूर्वी लहानपणापासूनच शिकवले जायचे. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरगुती उपाय सर्वांचे तोंडपाठ असायचे. आपल्याकडील दुसऱ्या देणे ही शिकवण देखील शिकवली जायची. महत्त्वाचे म्हणजे परमेश्वरालाही गोष्टी अर्पण केल्याने तो आपल्याला काहीही कमी पडू देत नाही, ही सुद्धा भावना शिवामुष्टी पूजेमागे आहे. शिवामूठ म्हणजे मूठभर धान्य वाहणे.
(नक्की वाचा: Shravan 2025 Horoscope:श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय)
श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (Shravan Somwar And Shivamuth)
- पहिला श्रावणी सोमवार : 28 जुलै
शिवामूठ : तांदूळ
- दुसरा श्रावणी सोमवार : 4 ऑगस्ट
शिवामूठ : तीळ
- तिसरा श्रावणी सोमवार : 11 ऑगस्ट
शिवामूठ : मूग
- चौथा श्रावणी सोमवार : 18 ऑगस्ट
शिवामूठ : जव
श्रावण महिन्यातील शिवशंकराची लक्ष पूजा म्हणजे काय? (Shravan Month Shiva Puja Importance)
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात शिवलिंगावर रोज रुद्राभिषेक करण्याचा सल्ला दिला जातो. रोज शक्य नसेल तर महिन्यातून किमान एकदा तरी रुद्राभिषेक करावा. तसेच आपल्या अतिशय प्रिय असणाऱ्या खाद्यपदार्थाचा त्याग या महिन्यामध्ये करावा, असेही म्हणतात. वेगवेळ्या प्रकराची फुले, फळे, धान्य, तुळस, बेलपत्र, आघाड्याचे पाने इत्यादी पूजा सामग्रींनी भगवान शंकराची लक्ष पूजा करावी म्हणजे हा एक लाख संख्येमध्ये या गोष्टी शिवशंकराला अर्पण कराव्या. तसेच भगवान शंकराला पंचामृताचा अभिषेकही अतिशय प्रिय आहे.
नक्त व्रत म्हणजे काय? (Nakt Vrat Importance)
श्रावण महिन्यामध्ये नक्त व्रताचे विशेष महत्त्व आहे. नक्त व्रत म्हणजे दिवसभर उपवास करावा. सूर्यास्ताच्या वेळी शिवशंकराची पूजा करुन उपवास सोडणे यास नक्त व्रत असे म्हणतात.
(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)
श्रावण महिन्यातील अनुष्ठानाचे नियम (Shravan Month Anushthan Niyam)
- पारायण काळामध्ये आपण ज्या काही नियमांचे पालन करत असतो, त्या नियमांचे श्रावण महिन्यामध्ये पालन करावे.
- फलाहार करावा.
- हाविष्यान्न आहाराचे सेवन करावे.
- जमिनीवर किंवा घोंगडीवर झोपावे.
- ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.
- सत्यभाषण करावे, कोणाचाही द्वेष / मत्सर करू नये.
- मन शुद्ध ठेवावे.
- जेणेकरुन श्रावण महिन्यामध्ये केलेले कोणतेही शुभकर्म फलदायी होण्यास मदत मिळेल.
- श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत तुम्ही केले तर वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते, असे म्हणतात.
- ज्यांना लक्ष्मीप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी.
- एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करण्याचा प्रयत्न करावा.
- मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या.
- दीर्घायुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिशंकराचे पूजन करावे.
- विद्याप्राप्ती करायची असेल किंवा शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवाचे जाईच्या फुलांनी पूजन करावे
- कृष्ण पक्षातील अष्टमी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थदशी तिथीला भगवान शंकराचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे.
- कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला धारोष्ण गाईच्या दुधाचा अभिषेक केला तर मागील 21 पिढ्यांचा उद्धार होतो, असे म्हणतात.
- कृष्ण पक्षातील चतुर्थदशी तिथीला दूध, दही, तूप, पाणी इत्यादी गोष्टींनी शिवलिंगाचे पूजन केले तर शिवसायुज्य प्राप्त होते, असे म्हणतात.
- या दोनही तिथींना दह्याने शिवलिंगाचे पूजन केले तर पापक्षय होतो, असे म्हणतात.
- या दोनही मधाने शिवलिंगाचा अभिषेक केला तार राजसु नावाच्या यज्ञाचे फळ प्राप्त होते, असे म्हणतात.
शिवशंकराचे पूजन करताना मुख उत्तरे दिशेकडे ठेवून करावे, असे शास्त्रामध्ये म्हटलंय. कारण उत्तर दिशेला हिमालय पर्वत आहे, जेथे भगवान शंकराचा वास आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world