सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगमधून तब्बल 5 किलो सोने चोरीला गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या या सोन्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही चोरी 6 ते 7 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानकांदरम्यान झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी असलेले अभयकुमार जैन हे त्यांच्या मुलीसोबत रेल्वेच्या एसी कोच ए-1 मधून प्रवास करत होते. जैन यांची बर्थ क्रमांक 51 आणि 49 होती. जैन यांनी त्यांच्यासोबत दोन ट्रॉली बॅग ठेवल्या होत्या, ज्यामध्ये अंदाजे 5 किलो सोने ठेवलेले होते. हे सोने त्यांनी सुरक्षिततेसाठी बर्थच्या खाली लॉक करून ठेवले होते. 7 डिसेंबर रोजी कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी जैन यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी पाहिले असता, बर्थखाली ठेवलेली बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
(नक्की वाचा- Yavatmal News: शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेतील एका प्रश्नामुळे खळबळ; शिक्षकांनी व्यक्त केला संताप)
बॅग जागेवर नसल्याचे कळताच जैन यांनी तातडीने तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांना संपर्क केला. तसेच, त्यांनी रेल्वे मदत सेवेलाही या घटनेची माहिती दिली. घटनेचे ठिकाण कल्याणजवळ असल्याने, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जैन यांना कल्याण जीआरपीकडे पाठवण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चोरीची फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे.
एसी कोचमध्ये आणि बर्थखाली लॉक केलेली असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची चोरी होणे, हा रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न आहे. रेल्वे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवाशांची चौकशी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत