अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील वाकडी गावात एका मांजराला वाचवताना पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल राज्यभरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असताना एका गावात जीवघेणी शांतता पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकडी गावात एका घराजवळच वापरात नसलेली एक विहीर आहे. त्या विहीरीचा वापर शेण टाकण्यासाठी केला जात होता. अचानक या विहिरीत मांजर पडलं, त्याला वाचविण्यासाठी विशाल काळे (23) विहिरीत उतरले होते. ते गाळात रुतल्याचं पाहताच मागोमाग त्यांचे वडील अनिल काळे (58) विहिरीत उतरले. बराच वेळ झाला तरी ते वर न आल्याने सालगडी बाबासाहेब पवार (35) विहिरीत उतरले. तेही विहिरीतील गाळात अडकून पडले.
यानंतर अनिल यांचे चुलतभाऊ संदीप काळे (36) विहिरीत उतरलेय तेही वर आले नाही. यानंतर त्यांचे वडील माणिक काळे (65) विहिरीत उतरले. मात्र या सहा पैकी पाच जणांना गुदनरून मृत्यू झाला. यातील विजय काळे (36) यांचा वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काळे यांनी कमरेला दोरी बांधून विहिरीत उडी टाकली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.