देवा राखुंडे, प्रतिनिधी
Ramesh Thorat News : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडून पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून रंगत होती. आता यावरती शिक्कामोर्तब झाले असून उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे घर वापसी करणार अशा चर्चा होत्या मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे या चर्चांना अधिक ऊत आला होता. आता एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजित पवार गटात पक्ष पवेश होणार आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या मेळाव्यात माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
नक्की वाचा - शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची मोठी कारवाई, आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी
राहुल कुल यांकडून रमेश थोरातांचा तीन वेळा पराभव...
भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.यंदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती झाल्यानंतर रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली होती.मात्र त्यांचा या निवडणुकीतही पराभव झाल्याने ते काहीसे नाराज होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रमेश थोरात यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. विधानसभेला मात्र महायुतीमुळे थोरात यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. थोरात यांनी राहुल कुल यांच्या विरोधात तुतारी चिन्हावरती दौंड विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीतही थोरात यांचा पूल यांच्याकडून पराभव झाला. अजित पवारांनी यापूर्वी रमेश थोरात यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद देऊन मोठी ताकद दिली होती सध्या देखील रमेश थोरात हे बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.