जाहिरात

Gadchiroli Exam Cheating: ChatGPT वापरून चीट! गडचिरोलीत कॉपी प्रकरणी शिपाई, शिक्षक, केंद्र संचालकावर गुन्हा

Gadchiroli Exam Cheating: गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत चॅटजीपीटीचा वापर करून कॉपी पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Gadchiroli Exam Cheating: ChatGPT वापरून चीट! गडचिरोलीत कॉपी प्रकरणी शिपाई, शिक्षक, केंद्र संचालकावर गुन्हा

मनीष रक्षमवार, गडचिरोली

Gadchiroli Exam Cheating: तंत्रज्ञानाचा गैरवापर कल्पनेपलीकडे जाऊ शकतो, याचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे आला आहे. दुर्गम भागात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी होण्याऐवजी चक्क 'कॉपी' करण्यासाठी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारावीच्या परीक्षेत चक्क ChatGPT या AI तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळेच्या ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

भरारी पथकाची धाड आणि संशयास्पद हालचाली

चामोर्शीतील एका परीक्षा केंद्रावर 18 फेब्रुवारी रोजी बारावीचे पेपर सुरू असताना शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकली. परीक्षा संपण्याच्या काही मिनिटे आधी पथक पोहोचले. केंद्रावरील शिपाई सूरज केळझरकर याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे कॉपीच्या चिठ्ठ्या सापडल्या, ज्यांची उत्तरे चॅटजीपीटीद्वारे तयार केलेली होती.

(नक्की वाचा-  Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)

अशी चालत होती AI कॉपी

तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कॉपीची सिस्टीम राबवली होती. केंद्रावरील शिपाई सूरज पेपर सुरू झाल्यावर त्याचे फोटो काढून शिक्षक महेंद्र किरमे यांना पाठवत असे.  शिक्षक किरमे हे प्रश्न 'चॅटजीपीटी'वर अपलोड करून अवघ्या काही सेकंदात त्याची अचूक उत्तरे मिळवत असे. मिळालेल्या उत्तरांच्या तातडीने प्रिंट काढून त्या शिपायामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. राज्यशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा कठीण विषयांच्या पेपरमध्ये हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

कारवाईचा बडगा

या प्रकरणी पोलिसांनी आणि शिक्षण विभागाने कठोर कारवाई केली आहे. शिक्षक सुशील लांजेवार, केंद्र संचालक महेंद्र बुरलेवार, शिक्षक महेंद्र किरमे आणि शिपाई सूरज केळझरकर यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सुशील लांजेवार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com