Thane Ghodbunder Traffic: घोडबंदर रोडवर काय झाले ? रस्ता पूर्ण जाम, 20 मिनिटे गाड्या एकाच जागी उभ्या

Ghodbunder Road Traffic Jam: या वाहतूक कोंडीमुळे कामावर निघालेल्या नागरिकांना आणि सर्वसामान्यांना भयंकर त्रास सहन करावा लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ghodbunder Traffic Jam: मानपाडा ते फाउंटन हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ठाणे:

रिझवान शेख

ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज सकाळी पुन्हा एकदा खतरनाक वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीने ठाणेकरांचे अक्षरशः कंबरडे मोडले. मानपाडा ते फाउंटन हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली सगळी वाहने 20 मिनिटे एकाच जागी उभी होती. या वाहतूक कोंडीमुळे कामावर निघालेल्या नागरिकांना आणि सर्वसामान्यांना भयंकर त्रास सहन करावा लागला. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी ही केवळ एक दिवसाची समस्या नसून, ही रोजचीच समस्या बनली आहे.  

नक्की वाचा: नागरिकांनो, खड्ड्यांची सवय करा, सुटका नाहीच; महापालिकेची आकडेवारी पाहून होईल अपेक्षा भंग!

बुधवारच्या घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण होते?

घोडबंदर रोडवर सुरू असलेली विकासकामे, खड्डे, मुंगीच्या पावलाने जाणारी अवजड वाहने, बेशिस्त वाहनचालक, बेदरकार रिक्षावाले हे या सगळ्या वाहतूक कोंडीला जबाबदार आहे. घोडबंद रोडवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी आणि ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावेत अशी मागणी करण्यात येते. मात्र या रस्त्यावर अपवादानाचे वाहतूक पोलीस दिसतात आणि जे असतात ते या कोंडीमुळे पूर्णपणे हतबल असतात असे या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलीस काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले, तरी मूळ समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासन कमी पडत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 'नियम फक्त कागदावरच' असे चित्र आहे, कारण अवजड वाहनांना मनाई असूनही ती बिनबोभाटपणे रस्त्यांवरून धावतात आणि कोंडीत आणखी भर घालतात असे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा: ई-वाहन क्रांती म्हणजे काय? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट सांगितलं

नियमांचे पालन करा, पोलिसांचे आवाहन

याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे. या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले असता ते वाद घालतात, अंगावर धावून जातात असे पोलिसांचे म्हणणे आहे.  वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे, तरच ही कोंडी सुटू शकेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Topics mentioned in this article