
ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे. पर्यावरणपूरक मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. “व्हील्स ऑफ चेंज - अंडरस्टँडिंग ईव्ही ॲडॉप्शन फॉर मुंबई ऑटो अँड टॅक्सी ड्रायव्हर्स” कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते.
या कार्यक्रमास परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश ढाकणे, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पाई तसेच मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबईसह महाराष्ट्राला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असं ही यावेळी सरनाईक म्हणाले. भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world