
विशाल पाटील, प्रतिनिधी
mumbai pothole free : मुंबईकरांचे खड्डेमुक्त रस्त्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2023 मध्ये तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाला सुरुवात झाली होती. मात्र, अद्याप या कामांचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai News)
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, एकूण ६९८ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पापैकी आतापर्यंत केवळ ४९ टक्के कामं पूर्ण झाली आहेत. म्हणजेच, १,३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे ऑक्टोबरपासून गतीने हाती घेण्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी २०२७ साल उजाडणार आहे.
दरम्यान, २५ रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये साधारण ५ किलोमीटर लांबीचे रस्ते येतात. यामागचे कारण म्हणजे संबंधित रस्ते सुस्थितीत असल्याचे अहवाल व नागरिकांकडून झालेला विरोध. मुंबई महापालिकेने या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असला, तरी कामांच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागणाऱ्या मुंबईकरांना पूर्णपणे खड्डेमुक्त रस्ते मिळवण्यासाठी अजून काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईच्या खड्डेमुक्त रस्त्याचे स्वप्न २०२७ पर्यंत लांबणार असल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - BMC News : मुंबईत ‘खड्डेमुक्त' रस्त्यांचे काम कुठवर आले? आता एका क्लिकवर कळणार सर्व माहिती
पालिकेचा नवा डिजिटल उपक्रम
मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक नवा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. आता मुंबईकरांना त्यांच्या घरबसल्या शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. यामुळे कामांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन नागरिक थेट प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील.
प्रगतीचा पारदर्शक डॅशबोर्ड
महानगरपालिकेने सुरू केलेल्या या डॅशबोर्डवर प्रत्येक परिमंडळ आणि विभागानुसार रस्ते काँक्रिटीकरणाची सध्याची स्थिती पाहता येते. यात पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली कामे, सध्या सुरू असलेली कामे आणि अद्याप सुरू न झालेली कामे यांची माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, यंदाचा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणती कामे हाती घेतली जाणार आहेत आणि ती पूर्ण होण्यास अंदाजे किती कालावधी लागेल, याचे वेळापत्रकही यावर पाहता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world