Marathwada School Holiday : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. दरम्यान आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती पाहता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.
धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून शिक्षण विभागाने यासंदर्भातील सुट्टीचे पत्रक काढले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार बीड जिल्ह्यात 22 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच तालुक्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने बीड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.