Nanded Rains: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात सुमारे 206 मिमी पाऊस झाला असून, लातूर, उदगीर आणि कर्नाटकहूनही पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हसनाळ येथील अनेक गावे बाधित झाली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, रावनगाव येथे 225 नागरिक अडकले होते, ज्यापैकी अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हसनाळ येथे 8, भासवाडी येथे 20, आणि भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असले तरी ते सर्व सुरक्षित आहेत. दुर्दैवाने 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
(नक्की वाचा- Mumbai Rains Live Updates: कुठे पाणी साचलं, कुठे वाहतूक ठप्प; मुंबईतील पावसाच्या A टू Z अपडेट्स!)
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री स्वतः नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. बचावकार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नांदेड, लातूर आणि बिदरचे जिल्हाधिकारी एकमेकांसोबत समन्वय साधत आहेत. एनडीआरएफची 1 टीम, लष्कराचे 1 पथक आणि पोलिसांची टीम बचावकार्यात सहभागी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरहूनही लष्कराची एक तुकडी मदतीसाठी रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला बाधित भागात राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा - Mumbai School Holiday : मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर; कार्यालयांनाही मिळणार का?)
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जीवित हानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा बळी गेला आहे. 107 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 698 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 1 लाख 19 हजार 964 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.