कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान शनिवार रविवारी रायगड जिल्ह्यातील वाढणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे (Raigad Tourist Places
) येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ (Alibaug to Wadkhal National Highway) राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ए या मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे अलिबाग व मुरुड तालुक्यातील विविध पर्यटन स्थळी येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा - Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! आयटीनगरी हिंजवडी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी
वाहतूक बंदीचे वेळापत्रक -
शनिवार: सकाळी 8 ते दुपारी 2
रविवार: दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत असे राहील.
जड-अवजड वाहने (ट्रक, कंटेनर, डंपर इ.) इत्यादी वाहनांना बंदी असेल तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस,औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल.
हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव मिळेल. वाहनचालक व नागरिकांनी सहकार्य करावे, वाहतूक बंदीच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.