Hingoli Earthquake News: महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यासह शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये शनिवारी (11 एप्रिल) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पांगरा शिंदे गावातील काही घरे आणि सार्वजनिक इमारतींना तडे गेले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्याने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने शनिवारी सकाळी 8.45 वाजता भूकंपाची नोंद झाल्या सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावात जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते.
कुठे-कुठे काय-काय नुकसान झाले?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नांदेड शहर आणि ग्रामीण भागातील अर्धापूर, हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यासह साथ परभणी जिल्ह्यातही काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान प्रभावित जिल्ह्यांमधून कोणतेही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. पण काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय.
हिंगोलीत घरांना तडा
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरा शिंदे गावातील काही घरे आणि सार्वजनिक इमारतींना तडा गेल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रशासकीय पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
स्थानिक प्रशासनाने लोकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड आणि परभणीमध्ये आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Photo Credit: NDTV Marathi
परिसरात भीतीचे वातावरणनांदेडमधील एका शिक्षकाने आपला अनुभव सांगताना म्हटले की,"मी कॉलेजच्या स्टाफ रूममध्ये काम करत असताना अचानक धक्के जाणवले आणि एक वेगळाच आवाज ऐकू आल्याने मी क्षणभर गोंधळलो, थोड्या वेळाने तो भूकंपाचा धक्का असल्याचे लक्षात आले."
(नक्की वाचा: Earthquake VIDEO: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के! 5 जिल्हे हादरले; नागरिकांची धावपळ, सर्वत्र पळापळ)
Photo Credit: NDTV Marathi
प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारी
प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून खालील सूचना देण्यात आल्या आहेत:
- ज्यांच्या घरांवर पत्रे आहेत, त्यांनी पत्रांवरील जड दगड काढून टाकावे आणि पत्रे बोल्टने सुरक्षित करावे.
- भूकंपाचा धक्का किंवा असामान्य आवाज आल्यास तातडीने मोकळ्या जागेत जावे.
- आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
- नांदेड आणि परभणी जिल्ह्यात आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.