- हिंगोळी महावितरणमधील अधीक्षकांनी कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे
- कंत्राटी कर्मचारी सात महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने आर्थिक अडचणीत आहे
- व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला अपमानास्पद शब्द वापरले आहेत
समाधान कांबळे
एक व्हायरल ऑडीओ क्लिपने सध्या हिंगोळी जिल्ह्यात एकट खळबळ उडाली आहे. यातून हिंगोली महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अरेरावी समोर आली आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पगाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण यांनी थेट कामावरून काढण्याची धमकी दिली आहे, असा आरोप संबंधीत कंत्राटी कर्मचाऱ्याने केले आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
माणिक पंडित या कंत्राटी कर्मचाऱ्याने आपल्या थकीत वेतनाबाबत अधीक्षक अभियंता चव्हाण यांना फोन केला होता. मात्र, तक्रार ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्याने उलट या कर्मचाऱ्यालाच दमदाटी केली. "नॉन सेन्स, तुझी औकात काय? मी या जिल्ह्याचा बॉस आहे, मला पुन्हा फोन लावू नकोस," असे शब्द वापरून त्यांनी कर्मचाऱ्याचा अपमान केला. जे काही आहे ते तू संबंधीत एजन्सी सोबत बोल. तुमला फोन करायला नको होता. मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रमुख आहे. त्यामुळे तू मला फोन लावून चुक केली आहे, असं ते या फोन कॉलमध्ये बोलताना दिसत आहेत. ही फोन कॉल क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप
एकीकडे 6-7 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर हिंगोलीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निवेदने दिली आहेत. प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाची काय दखल घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या घटनेनंतर कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अधिकारी आपल्या सोबत असे का वागत आहेत असा प्रश्न ही त्यांनी केला आहे.
संपर्क करण्याचा प्रयत्न
ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा एनडीटीव्ही मराठीने प्रयत्न केला. त्यासाठी अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी ही ऑडीओ क्लिप अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण यांचीच असल्याचा दावा केला आहे. आपण त्यांना फोन केला होता असं ही माणिक पंडित यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महावितरणच्या या 'बॉस'गिरीमुळे आता कर्मचाऱ्यांच्या पदरात वेतन पडणार की केवळ धमक्याच मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world