समाधान कांबळे, प्रतिनिधी
Hingoli News : 'मम्मी मला माफ कर, माझा ताण घेऊ नको... पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्माला येईन' हे शब्द आहेत हिंगोलीच्या पिंपरखेड इथं राहणाऱ्या अवघ्या 18 वर्षांच्या सुशील विलास ढगे या विद्यार्थ्याचे. त्यानं आत्महत्या केली आहे. मात्र त्याचं कारण तुम्हाला माहितीये का? त्याच्या आत्महत्येला कारण ठरली देशभरात गाजलेली नीट परीक्षा. सुशीलला नीटचा पेपर अवघड गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्याने आईला शेवटचा व्हिडिओ पाठवल्यानंतर विहिरीत उडी मारली.
नीट परीक्षेमुळे टोकाचं पाऊल
हिंगोलीतील 18 वर्षीय सुशील नीटची तयारी करीत होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने प्रचंड मेहनत केली होती. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर सुशील नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्यानेही फेरपरीक्षेचा पेपर दिला होता. मात्र फेरपरीक्षेचा पेपर कठीण गेल्याने सुशील तणावात होता. यातूनच सुशीलने अखेर टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
पेपरफुटीनंतर सुशील तणावात...
सुशील हा खूप हुशार विद्यार्थी होता. त्याचा मोठा भाऊही अभ्यास करून BAMS झाला. आपणही डॉक्टर व्हावं या आशेने सुशीलने NEET परीक्षेची तयारी केली होती. आधी झालेल्या NEET परीक्षेमध्ये त्याने चांगला अभ्यास केला होता. मात्र NEET पेपर फुटी नंतर सुशील प्रचंड तणावात गेला. दरम्यान सुशीलने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलमध्ये एक भावनिक व्हिडिओ बनवला होता. त्यात तो आपल्या आईची माफी मागतोय. या घटनेनंतर आईनं न्यायाची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रिया करण्यात आली. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक नोंदीनुसार, नीट परीक्षा अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.