समाधान कांबळे/ नाझीर खान/ योगेश लाटकर, NDTV मराठी
महाराष्ट्रातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल मध्यरात्री पुन्हा एकदा या भागाला भूकंपाच्या लागोपाठ 3 ते 4 तीव्र धक्क्यांनी हादरवून सोडले. हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांसह शेजारील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही हे हादरे स्पष्टपणे जाणवले. जुलैच्या सुरुवातीला 2 जुलै रोजी आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच हा मोठा भूकंप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण आहे.
पांग्रा शिंदे आणि काकडधाबा केंद्रबिंदू
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) आणि स्थानिक भूकंपमापक केंद्राच्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर एकापाठोपाठ एक असे धक्के नोंदवले गेले.
पहिला मुख्य धक्का पहाटे 1.37 वाजता बसला असून या धक्क्याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी मोठी होती. याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. हा धक्का बसण्यापूर्वी भूगर्भातून मोठा गूढ आवाज आला आणि जमीन हादरली.
दुसरा धक्का पहाटे 2.15 वाजता अवघ्या काही मिनिटांतच 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. तिसरा धक्का पहाटे 2.17 वाजता लगेचच 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा झटका जाणवला. या दोन्ही धक्क्यांचे केंद्र पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम-उत्तरेकडील काकडधाबा गावात होते आणि त्यांची खोलीही 10 किमी होती. तर चौथा धक्का पहाटे 3.23 वाजता पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
मंदिरांवरील भोंग्यांवरून दिल्या सूचना
गाढ झोपेत असताना अचानक आलेल्या या संकटामुळे गावागावांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखून अनेक गावांमधील मंदिरांवरील लाऊडस्पीकर गावकऱ्यांना तातडीने जागे होण्याच्या आणि मोकळ्या जागेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक नागरिक लहान मुले आणि वृद्धांना घेऊन रात्रभर घराबाहेर, रस्त्यावर आणि मैदानांत बसून होते.
या तीव्र धक्क्यांमुळे पांग्रा शिंदे आणि काकडधाबा परिसरातील काही जुन्या आणि मातीच्या घरांच्या भिंतींना तडे गेले असून अंशतः नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही **जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.**
11 एप्रिलच्या भूकंपाच्या आठवणी ताज्या
या भागात यापूर्वी 11 एप्रिल 2026 रोजी 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता, कालच्या धक्क्याने त्या भीतीदायक आठवणी पुन्हा ताज्या केल्या. विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला 2 जुलै 2026 रोजी अवघ्या 10 तासांच्या अंतरात हिंगोलीत दोन भूकंप झाले होते. पहिला मध्यरात्री 1.20 वाजता औंढा नागनाथ येथे आणि दुसरा सकाळी 10.14 वाजता लोहरा गावात आला होता, ज्याचे हादरे धाराशीवपर्यंत जाणवले होते. पावसाळा सुरू होताच जमिनीखाली होणाऱ्या अंतर्गत हालचाली आणि पाण्याच्या दाबामुळे हे भूकंपाचे सत्र वारंवार घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.