बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत जन्म झालेल्या शिवसेनेनं नेहमीच आक्रमक राजकारण केलं आहे. मराठी भूमिपूत्रांचा विषय हाती घेत दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या राजकारणाला सुरुवात केलेली. तेव्हा थेट रस्त्यावर उतरुन प्रश्नांना भिडणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती. 1980 च्या दशकाच्या शेवटी शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाशी युती केली. त्यानंतर दोन दशकांपेक्षा जास्त काळ हे दोन पक्ष एकत्र होते. त्यामुळे
पक्षाच्या स्थापनेपासून शिवसेनेनं आजवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी युती केली आहे. गेल्या 58 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेनं कोणत्या पक्षाशी आणि कधी जवळीक साधली होती हे पाहूया
कोणत्या पक्षाशी केली होती शिवसेनेनं युती?
* 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.
* दोनच वर्षांनी 1968 रोजी मुबंई महापालिका निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षासोबत युती केली. ही युती 1970 पर्यंत टिकली.
* 1972 शिवसेनेने- रा. सु. गवई यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती केली. ही युती अल्पकाळच टिकली.
* 1972 साली शिवसेनेने आणि मुस्लिम लीगसोबत युती करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
* 1978 साली शिवसेना आणि दलित पँथरमध्ये देखील युती झाली होती.
* 1977, 1980 साली शिवसेनेने इंदिरा काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पण दोन्ही पक्षांची अधिकृत युती नव्हती.
* शिवसेनेनं 1984 साली भाजपसोबत युती केली होती. पण काही वर्षातच ही युती तुटली.
* 1985 साली शिवसेना आणि समाजवादी काँग्रेस यांची युती झाली होती.
* 1989 साली पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा हे दोन पक्ष एकत्र आले. तब्बल 25 वर्ष ही युती टिकली.
* 2011 साली शिवसेनेने रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षाला आपल्यासोबत युतीत सामील करुन घेतलं आणि महायुतीची स्थापना केली. ज्यामध्ये नंतर छोटे-छोटे घटक पक्षही सामील झाले.
* 2014 साली भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी तोडली. मात्र, निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.
* 2019 लोकसभा-विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा अधिकृतपणे शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली.
* 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली.
* 2019 साली शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी काही पोटनिवडणुका या महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांनी एकत्रितरित्या लढवल्या.
* 2022 साली शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष स्थापन झाले.
* 2023 साली शिवसेनेने (उबाठा) प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत युती केली.