
Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ वाढला आहे. मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात पावसानं (Marathwada Rain) शेतीचं मोठं नुकसान केलंय. शेतकऱ्यांसमोर कसं जगावं हा मोठा प्रश्न या पावसानं उपस्थित केलाय. सप्टेंबर महिना संपत आला तरी मान्सून परतलेला नाही. राज्यात पावसाचा मुक्काम दसऱ्यानंतरही राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढचे 72 तास महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी (26 सप्टेंबर) हवामान विभागानं हा इशारा दिला आहे.
काय आहे इशारा?
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.रायगड आणि पुणे घाटमाथा या संवेदनशील भागांसाठी 28 सप्टेंबर रोजी 'रेड अलर्ट' असल्याने, या जिल्ह्यांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
विजांचा कडकडाट, जोरदार वारा (30-40 kmph) आणि पावसाची तीव्रता संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी (26 सप्टेंबर) जाणवेल.
मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे 26 सप्टेंबर रोजी वादळी पावसाचा, तर 27 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता हवामान विभागानं काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
( नक्की वाचा : IMD Rain Update: राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांत जोरदार हजेरी, वाचा संपूर्ण अंदाज )
काय करावे? (Action Suggested):
घराबाहेर पडण्यापूर्वी रस्त्यावरील वाहतूक कोंडी तपासा.
जुन्या आणि कमजोर बांधकामात राहणे टाळा.
विजेच्या कडकडाटाच्या वेळी उंच झाडे किंवा विद्युत वाहक वस्तूंखाली आसरा घेऊ नका.
घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा.
शेतकऱ्यांसाठी सल्ला (Agromet Advisory)
पिकलेली पिके लवकरात लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा.
झाकून ठेवा: कापणी केलेला माल व्यवस्थित झाकून ठेवावा.
शेतात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित काढून टाकण्याची व्यवस्था करावी.
गुरे आणि शेतातील जनावरांना वादळ आणि विजांच्या वेळी गोठ्यात किंवा घरामध्ये सुरक्षित ठेवा.
पुढील काही दिवस हवामान विभागाच्या ताज्या सूचनांवर लक्ष ठेवा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world