ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv News: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने राज्यातील अनेक पर्यटक परदेशात अडकले आहेत. राज्य सरकारकडून या पर्यटकांना परत आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन देण्यात आले होते, मात्र दुबईत अडकलेल्या उमरग्याच्या चार ज्येष्ठ नागरिकांनी भारतात परतल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दुबईत अडकलेल्या पर्यटकांचे हाल
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे व सुजाता दळगडे तसेच सोलापूर येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक बंद झाली आणि ते दुबईत अडकून पडले. त्यांच्या २२ जणांच्या ग्रुपने वारंवार सरकार व प्रशासनाकडे मदतीची याचना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला, मात्र प्रत्यक्ष मदतीच्या वेळी कोणीही पुढे आले नाही, असा आरोप या ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. दिवसेंदिवस वाढणारा मुक्काम, वाढणारा खर्च आणि अनिश्चिततेच्या छायेत या ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
अखेर कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने फक्त या चौघांनाच स्वतःच्या पदरचे तब्बल १ लाख ५६ हजार ९९६ रुपये खर्च करून मायदेशी परतावे लागले. ऐन युद्धकाळात ज्येष्ठ नागरिकांची झालेली ही हेळसांड धक्कादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून शासनाने आता तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world