मंगेश जोशी, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता साकरी गावात एका 23 वर्षीय तरुणावर अमानुष हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुंडांनी मदतीला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही सोडले नाही. त्यामुळे भुसावळ तालुक्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयाचे भूत डोक्यात संचारलेल्या आरोपींनी तरुणाला गाठून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी लाकडी दांडके आणि चक्क फावड्याने तरुणाला बेदम मारले. यात तो तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मारहाण करून आरोपींचे समाधान झाले नाही, त्यांनी जखमी तरुणाला जवळच्या विहिरीत फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच एक पोलीस कर्मचारी मदतीसाठी धावला. मात्र, संतापलेल्या आरोपींनी त्या वर्दीधारी पोलिसालाही धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
(नक्की वाचा- Toll Waiver: मोठी गुडन्यूज! मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर 3 दिवस टोलमाफी; कसा अन् कोणाला मिळणार लाभ? वाचा....)
भुसावळमधील गुन्हेगारीचे सत्र
काही दिवसांपूर्वीच भुसावळमध्ये एका तरुणाला विवस्त्र करून खांबाला बांधून अत्याचार केल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच साकरीतील या नव्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: एका अफवेने नागरिकांची उडाली झोप; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा)
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणाला गंभीर इजा पोहोचवणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून त्याला कर्तव्य पार पाडण्यापासून रोखणे याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, कोणाचीही गय केली जाणार नाही. तालुक्यातील शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world