मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी, 5 मे रोजी रेल्वे रुळावर एक पुरुष महिला व तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. रेल्वेखाली आल्याने तिघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले होते. पोलिसांनी तपासाअंती या तीनही मृतदेहांची ओळख पटवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजेंद्र मोरे, राधिका ठाकरे व तिचा तीन वर्षाचा मुलगा अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र आणि राधिका यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. मात्र दोघांनीही होणाऱ्या विरोधामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे.
(नक्की वाचा- Shirdi Crime : धार्मिक केंद्र असलेल्या शिर्डीत प्रतिबंधित गुटखा तस्करीचं जाळं; पोलिसांची मोठी कारवाई)
जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावातील राजेंद्र मोरे या विवाहित तरुणाची INSTAGRAM वर बारामतीतील राधिका ठाकरे या विवाहितेसोबत ओळख झाली होती. राधिका विवाहित असून तिला तीन वर्षाचा मुलगा असूनही राजेंद्रच्या प्रेमात पडली.
राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्याने राजेंद्र बारामतीतून राधिकाला घेऊन आपल्या गावी भातखंडे खुर्द येथे आला. आपल्या घरी तो राधिकासोबत राहू लागला. मात्र यावरून राजेंद्र व त्याच्या पत्नीचे वाद वाढले. राजेंद्रला राधिकासोबत लग्न करायचे होते. मात्र घरच्यांनी त्याला विरोध केला. पत्नीशी वाद व घरच्यांचा विरोध यामुळे राजेंद्र व राधिका तिच्या तीन वर्षाच्या मुलासह गाव सोडून दुसऱ्या गावात राहू लागले.
नक्की वाचा - Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये भररस्त्यात साधुची हत्या, धक्कादायक CCTV समोर
काही महिने बाहेरगावी राहिल्यानंतर राजेंद्रने पुन्हा आपल्या घरी राधिकेला घेऊन राहण्याचा निश्चय केला. यासाठी राजेंद्र, राधिका व तिचा तीन वर्षाचा मुलगा हे गावाकडे यायला निघाले. मात्र गावाजवळ येताच परधाडे रेल्वे स्थानकाजवळ राजेंद्र व राधिकाने जीवन संपण्याचा निर्णय घेत आपल्या तीन वर्षाच्या मुलासह सोमवारी 5 मे च्या रात्री अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेस समोर स्वत:ला झोकून दिले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.