Jalna News : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जालन्यात समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून या अपघातात सात कामगार महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे.
जालन्यातली कडवंचीजवळ हा भीषण अपघात झाला. कामगारांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकपला भरधाव ट्रकने उडवल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील मृत्यू झालेले कामगार बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील असल्याची माहिती आहे. जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
समृद्धी महामार्गावरील स्वच्छता करणाऱ्या ७ महिलांचा मृत्यू
जालन्यातील कडवंचीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या महिंद्रा पिकपला ट्रकची जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह ८ ते ९ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील 15 कामगार एबी इंटरप्राईजेस या कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील स्वच्छता करण्यासाठी रोज जातात. महिला कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. या परिसरातील 15 महिला कामगार महिंद्रा पिकअपमध्ये बसून जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने महिंद्रा पिकअपला धडक दिली. यात 7 महिला कामगारांचा जागेवर मृत्यू झाला आहे. 8 ते 10 महिला कामगार आणि चालक गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असून अपघातातील मृत्यू झालेले कामगार बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह जालना पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.