नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : धुळे जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक थरारक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून एका पतीने आपल्याच नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन थेट एका विहिरीत फेकला.
तब्बल 9 दिवस पाण्यात कुजलेल्या या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते, मात्र त्याच्या हातावरील एका 'टॅटू'ने पोलिसांना तपासाचा अत्यंत महत्त्वाचा धागा मिळाला. मोहाडी पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत अवघ्या 24 तासांत या हत्याकांडाचे गूढ उकलले असून मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या दिवाणमळा गावातूनच बेड्या ठोकल्या आहेत.
टॅटूमुळे मृत्यूचं गूढ उकललं...
अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर RAVI आणि हातावर 'Radha' असे टॅटू गोंदवलेले पोलिसांना आढळले. यावरून तो मृतदेह दिवाणमळा येथील रवी मालचे याचा असल्याचं निष्पन्न झाले. आरोपीचे बापू मालाचे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून बापू मालाचे याने पत्नीच्या मदतीने 18 मार्चच्या रात्री रवीचा खून करून कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत बारकाईने अन् शिताफीने तपास करत अवघ्या एका दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world