निलेश बंगाले, प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यंटकांवर दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये. वर्ध्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जम्मू कश्मीर येथे पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07152-243446, 299010 किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांच्या 8888239900 किंवा सहाय्यक महसूल अधिकारी विजया फटींग यांच्या 8805741244 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाह निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सचिव श्रीपती मोरे यांनी केले आहे.
नक्की वाचा - J&K Pahalgam Attack : अखेर गुन्हेगारांची ओळख पटली, 26 जणांना न्याय मिळणार; दहशतवाद्यांचे फोटो आले समोर
सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील संपर्क झालेले सर्व 45 पर्यंटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. यातील 9 नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत व 36 नागरिक हॉटेल ब्राईट पॅलेस चंदननगर पहलगाम येथे वास्तव्यास होते. हे सर्वजण सुखरुप असून जम्मूसाठी प्रस्थान केले आहे. जिल्हा प्रशासन भ्रमणध्वनीद्वारे संपर्कात असून सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली. तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करुन प्रशासन घेत आहे. तरी जम्मू काश्मीरमध्ये पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.