सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) कंत्राटदारांच्या हक्काच्या 111 कोटी 63 लाख रुपयांच्या अनामत रकमेवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उघडकीस आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) जव्हार शाखेतील एका सतर्क अधिकाऱ्यामुळे हा मोठा घोटाळा होण्यापूर्वीच उधळला गेला. या प्रकरणी विक्रमगड नगरपंचायतीचा नगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे आणि यज्ञेश अंभिरे यांना ठाणे येथून अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा: माझा प्रियकर मरूनही जिंकला! मृतदेहाशी केले तरूणीने लग्न; नांदेडमधली 'सैराट' घटना
PWD अधिकाऱ्याची बनावट सही वापरून पैसे हडपण्याचा डाव
मिळालेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी ओवी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने जव्हार एसबीआय बँकेत डिमांड ड्राफ्टची (DD) मागणी करण्यात आली होती. यासाठी कार्यकारी अभियंता नितीन भोये आणि अकाउंटंट राकेश रंजन यांच्या बनावट सह्या असलेले पत्र व चेक सादर करण्यात आले. या पत्रात 'कोटी' ऐवजी ‘बिलियन' असा शब्दप्रयोग केल्याने आणि लिखाणाची शैली शासकीय दस्तऐवजांपेक्षा वेगळी वाटल्याने बँक अधिकाऱ्यांना संशय आला. एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी विभागाचे अधिकारी स्वतः न येता तिऱ्हाईत व्यक्ती आल्याने संशय अधिक बळावला. बँक व्यवस्थापकांनी थेट कार्यकारी अभियंता नितीन भोये यांची भेट घेतली असता, ‘पत्र विभागाचे आहे, पण सह्या आमच्या नाहीत,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या स्पष्टीकरणामुळे हा अपहाराचा संपूर्ण कट उघड झाला आणि बँकेने तत्काळ व्यवहार थांबवला. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची अनामत रक्कम सुरक्षित राहिली. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केल्यास PWD मधील अधिकारी वा कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.
पिंका पडवळे याला न्यायालयात हजर करणार
मुख्य आरोपी पिंका पडवळेला पोलिसांनी अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याच्यावर भारतीय न्याय सहिता कलम 336, 338, 318(1), 318(4), 3(5) अंतर्गत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: गणपती मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर, मंडळाच्या अध्यक्षाला तुरुंगवास
कंत्राटदारांची रक्कम परस्पर वळवण्याचा प्रयत्न
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) तब्बल 111 कोटी 65 लाख रुपयांच्या ठेवीवर बनावट डिमांड ड्राफ्टद्वारे अपहार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. कंत्राटदारांनी PWD अंतर्गत विकासकामांसाठी जमा केलेली ही अनामत रक्कम (EMD/Security Deposit) एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाच्या कंपनीत वळवण्याचा कट होता, मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) जव्हार शाखेतील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा वेळीच टळला. यामुळे असंख्य कंत्राटदारांचे नुकसान टळले आहे.
बँक अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला
मिळालेल्या माहितीनुसार, DD काढण्यासाठी सादर केलेल्या चेक आणि पत्रातील लेखनशैली, तसेच 111 कोटी 65 लाख रुपयांच्या एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी PWD विभागाचे अधिकारी स्वतः न येता एक कर्मचारी आल्याने बँक अधिकाऱ्याला संशय आला. संशय बळावल्यामुळे बँक अधिकाऱ्याने तातडीने कागदपत्रांवर अवलंबून न राहता जव्हार PWD कार्यालयाकडे धाव घेतली आणि थेट पडताळणी केली. यावेळी PWD अधिकाऱ्यांनी ‘आम्ही कोणताही चेक दिला नाही' असे स्पष्ट केल्यामुळे अपहाराचा संपूर्ण कट उघडकीस आला.
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचाही हात ?
या सगळ्या अपहारामागे ओवी कन्स्ट्रक्शन कंपनीचा हात असल्याचे बोलले जात होते. एका राजकीय नेत्याच्या जवळच्या नातेवाईकाची असल्याची कुजबूज सुरू होती, जी खरी ठरली. या 111.65 कोटी रुपयांमध्ये कंत्राटदारांच्या अनेक वर्षांच्या अनामत रकमेचा आणि त्यावर जमा झालेल्या व्याजाचा समावेश होता. वेळेवर बिलं मिळत नसल्याने अनेकदा कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशात त्यांचे पैसे सुरक्षित राहिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात PWD विभागातील कोणा अधिकारी वा कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.