अमजद खान
वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागल्याचा अजब प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. कल्याणहून मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जोडणाऱ्या शीळ रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासन् तास अडकून पडावे लागते. आता या वाहतूक कोंडीमुळे एका शाळेवर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची पाळी आली आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची वेळ डोंबिवलीतील प्रसिद्ध विद्या निकेतन शाळेवर आली आहे. या शाळेच्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एक बस रवाना झाली होती. शीळ रस्ता आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आणि विद्या निकेतन शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी निघालेली ही बस शाळेत परत आली नव्हती. यामुळे तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
वाहतूक कोंडीचे कारण काय?
कल्याणहून मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जोडणाऱ्या शीळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढली आहे. अनेक टोलेजंग प्रकल्प इथे आले असून या इमारतींमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. इथल्या रहिवाशांना डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, मुंबई किंवा ठाणे गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेकांना खासगी वाहने बाहेर काढावी लागतात. यामुळे या रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हे कमी होतं की काय म्हणून या रस्त्यावरून मेट्रो प्रकल्प नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्याने बॅरीकेड, पत्रे लावण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.
ट्रक बिघडल्याने आणखी कोंडी
शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत बोलताना कल्याण वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की या रस्त्याववर 14 टायरच्या ट्रकचा (मल्टी अॅक्सेल ट्रक) पाटा तुटला होता. हा ट्रक रस्त्यातून हटविण्यास वेळ लागला. त्यामुळे कोंडी झाली. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. आमच्याकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात.
विद्यार्थी आणि पालक चिंतेत
विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचावेत यासाठी पालकांना विद्यार्थ्यांना वेळेच्या बरेच आधी रवाना करावे लागते. वाहतूक कोंडीचा सामना करत बस वेळेत शाळेपर्यंत पोहोचवणे हे चालकांसाठी आणि वाहकांसाठी जिकिरीचं काम झालं आहे. विद्या निकेतन शाळेत सकाळी ८, सकाळी 10.30 आणि दुपारी 12.30 अशी तीन सत्रे आहेत. बुधवारी दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी गेलेल्या बस परतल्याच नाहीत. दुसऱ्या सत्रासाठीच्या बस आल्याच नाहीत तर त्या तिसऱ्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी कशा जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे नाईलाजास्तव बुधवारी तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली. वाहतूक कोंडीसोबतच कल्याण-डोंबिवलीत बेशिस्त वाहनचालकांमुळे हा प्रश्न अधिक चिघळल्याचे वलिद्या निकेतन शाळेचे विवेक पंडीत यांनी म्हटले आहे.
दाद मागायची कोणाकडे ? जनतेला पडलाय प्रश्न
वाढत्या नागरिकरणासह कल्याण आणि डोंबिवलीतील समस्या या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नाही अशी कल्याण-डोंबिवलीकरांची खंत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मेट्रोसाठी सुरू करण्यात आलेले काम हे नियोजनाशिवाय सुरू करण्यात आले आहे. बेशिस्तीमुळे शीळ रस्त्यावरील कोंडी वाढली आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देताच हे काम सुरू करण्यात आले.
एमएमआरडीए सोबत उद्या बैठक
शीळ रस्ता हा एमएमआरडीएच्या ताब्यात आहे. मेट्रो प्रकल्प हा देखील एमएमआरडीए राबवत आहे. त्यामुळे एमएमआरडीएनेच यावर तोडगा काढायला हवा अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आपण या संदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता असे पाटील यांनी म्हटले आहे. गुरुवारी एमएमआरडीएमध्ये यासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे कळते आहे.