Mother drives a rickshaw with her Daughter: आयुष्यातील कठीण परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मुलीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कल्याणमधील कोमल गायकवाड या रिक्षा चालवत संघर्ष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या दिवसभर आपल्या तीन वर्षांच्या मुलगी तेजस्वीला सोबत घेऊन रिक्षा चालवतात. आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि मुलीची काळजी या सगळ्यांशी झुंज देत त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
आधुनिक हिरकणीची कहाणी!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणमधील कोमल गायकवाड या सध्या आपल्या तीन वर्षांच्या मुलगी तेजस्वीसोबत रिक्षा चालवत जीवनाचा संघर्ष करत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि घर भाड्याचे असल्यामुळे त्यांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. त्यातच सासू आजारी असल्यामुळे त्यांचे पती गावी राहतात.
त्यामुळे मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नसल्याने कोमल गायकवाड यांना मुलीला सोबत घेऊनच काम करावे लागते.सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या रिक्षा चालवत काबाडकष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शिक्षण कमी असल्यामुळे आणि लहान मुलीला सोबत घेऊन कोणतेही काम देण्यास कोणी तयार नसल्याने त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
लेकीला घेऊन चालवते रिक्षा...
रिक्षा चालवताना मुलीची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन त्यांनी रिक्षामध्ये मुलीसाठी खास बसण्याचा स्टँड तयार करून घेतला आहे. त्या स्टँडमध्ये तेजस्वी त्यांच्या शेजारी आरामात बसते आणि त्यामुळे प्रवाशांनाही प्रवासादरम्यान कोणताही त्रास होत नाही.दिवसभर कष्ट करणारी ही माय-लेकरांची जोडी अनेकांच्या नजरेत भरत आहे. माझ्यावर जशी परिस्थिती आली तशी माझ्या मुलीवर येऊ नये, तिला चांगले शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवायचे आहे, असे स्वप्न कोमल गायकवाड यांनी व्यक्त केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world