Kalyan News : नागरिकांच्या सुरक्षेची आणि त्यांना सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. मात्र अनेकदा लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी नागरिकांना दैनंदिन आयुष्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान कल्याणमध्ये महिला महापौरांनी कंबर कसली आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फोन करुन सज्जड दम दिला आहे. महापौर थेट घटनास्थळी गेल्या आणि तेथे जाऊन पाहणी केली. काम न झाल्याचं लक्षात येताच त्यांनी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला.
मोठा अपघात होण्याची भीती...
कल्याण शहरातील प्रेम ऑटो परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अंडरग्राउंड मोठ्या चेंबरचे लोखंडी झाकण तुटल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या उघड्या चेंबरमुळे कोणताही नागरिक किंवा वाहनचालक पडून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धोकादायक स्थिती केडीएमच्या महापौर हर्षाली थविल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी महेश डावरे यांना फोन करून चांगलेच धारेवर धरले.
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारं हे कृत्य निष्काळजीपणाचं असल्याचं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांनी संबंधित खात्याचे अधिकारी महेश डावरे या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, आजच्या आज हे झाकण दुरुस्त करून सुरक्षित करा, अन्यथा तुम्हालाच त्या ठिकाणी आणून ठेवीन, असा सज्जड दम दिला. या घटनेमुळे केडीएमसीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून केडीएमसीचा निष्काळजीपणा समोर आला आहे.