जाहिरात

Karad North Politics : बाळासाहेब पाटील 'षटकार' लगावणार की मनोज घोरपडे विजयरथ रोखणार?

Karad North Constituency : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील 1,00,509 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष मनोज घोरपडे यांना 51294 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. घोरपडे यांचा 49000 मतांनी पराभव झाला होता.

Karad North Politics : बाळासाहेब पाटील 'षटकार' लगावणार की मनोज घोरपडे विजयरथ रोखणार?

सुजित आंबेकर, सातारा

कराड उत्तरने भल्याभल्यांना पाणी पाजलं, तर अनेकांना डोक्यावर सुद्धा घेतलं आहे. वेगळा इतिहास असलेल्या उत्तरमध्ये सलग पाच वेळा आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल गेल्या लोकसभा निवडणुकीत लागला. राज्यभर महाविकास आघाडीकडे कल असताना कराड उत्तरमध्ये विद्यमान आमदारांविरुद्ध एवढा असंतोष का निर्माण झाला? हा असंतोष कमी करण्यासाठी आमदारांनी काहीच पावले का उचलली नाहीत, असा प्रश्न पडतो आहे. 

गेल्या तीन निवडणुकांपासून भक्कम होत चाललेल्या भारतीय जनता पक्षाच्या त्रिदेवाच्या एकजुटीपुढे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीपुढे टिकण्यासाठी आगामी विधानसभेत बाळासाहेब पाटील कोणती खेळी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा मागील दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी या मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. पाचही वेळेला त्यांना वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीतून सामोरे जाताना अडचणी आल्या. मात्र त्यांनी यश मिळवले आहे.

सध्या येथे बाळासाहेब पाटील विरुद्ध मनोज घोरपडे अशी थेट लढत होत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ तसेच ॲड. उदयसिंह पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकसंघ राहिल्याचे मतांची आकडेवारी पाहिल्यानंतर स्पष्टपणे लक्षात येते. कराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना आमदार बाळासाहेब पाटील यांच्यापेक्षा मनोज घोरपडे व धैर्यशील कदम अधिक जवळचे वाटतात, हे वास्तव आहे. हा काँग्रेस गट बाळासाहेब पाटील यांना ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय शत्रु मानतो.

(नक्की वाचा-  VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात)

बाळासाहेब पाटील विरोधात असतील तर आपोआप हा संपूर्ण गट विरोधकांना जाऊन मिळतो. मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी कराड उत्तरमध्ये जो काँग्रेसचा गट बांधला होता, त्या गटासोबत त्यांचे आजही चांगले संबंध आहेत. घोरपडे व कदम भारतीय जनता पक्षामध्ये गेले तरी बाळासाहेब पाटील यांना विरोध म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते घोरपडे व कदम या जोडगोळीच्या पाठीशी असतात. 

कदम यांनी बांधलेला गट बाजार समिती निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला होता. दुसरीकडे मनोज घोरपडे यांनीही कराड उत्तर मतदारसंघात कराड तालुक्यातील काही गावांमध्ये चांगला गट बांधलेला आहे. सातारा तालुक्यात तर त्यांना मानणारा फार मोठा युवावर्ग आहे. घोरपडे यांनी बांधलेला हा गट लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने उभा राहिला होता. कोपर्डे जिल्हा परिषद गटात मसूर भागातील काही गावात रामकृष्ण वेताळ यांचे चालते. रामकृष्ण वेताळ यांना मानणारा हा गट बाळासाहेब पाटलांना विरोधक मानतो. धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आणि रामकृष्ण वेताळ यांनी कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मोठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

(नक्की वाचा-  अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)

2019 च्या निवडणुकीतील आकडेवारी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील 1,00,509 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष मनोज घोरपडे यांना 51294 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. घोरपडे यांचा 49000 मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीतही बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. तर महायुतीकडून मनोज घोरपडे मैदानात उतरले आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात अनेक वर्षे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिल्यामुळे नकारात्मक वातावरण तयार झालेले आहे. 

बाळासाहेब पाटलांसमोरील आव्हाने

आमदार बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आहेत. कारखान्याची आर्थिक सत्ता हातात असल्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांनी उत्तरवर प्राबल्य राखले आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तरुण फळी आज अखेर उभी केली नाही. खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा काही प्रमाणात असणारा युवावर्ग, आमदार पाटील यांच्यासोबत असला तरी, नव्या फळीचा तरुण वर्ग त्यांच्यासोबत आलेला नाही. किंबहुना त्या पद्धतीचे काम आमदार पाटील यांना करता आले नाही. पाच वर्षे आमदार म्हणून नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली नाराजी, दूर होत चाललेला युवावर्ग, कारखान्याच्या कामगारांमध्ये असणारी नाराजी, वेळेवर ऊसतोड मिळत नसल्यामुळे सभासदांमध्ये तयार झालेला रोष या गोष्टींचा पाटील यांना आगामी विधानसभेत फटका बसू शकतो. महायुतीच्या घोरपडे, कदम व वेताळ या त्रिकूटापुढे महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील यांचा कसा निभाव लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: