सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला (Kokan Rain Update) अजस्त्र लाटांचा तडाखा पाहायला मिळाला. समुद्रात सध्या साडेचार मीटर पेक्षा उंचीच्या लाटा धडकत आहेत. अजस्त्र लाटांचे सध्या किनारपट्टी भागात तांडव पाहायला मिळत आहे. आज जून महिन्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती होणार आहे. त्यामुळे समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत.
किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील मांडवी जेटी सुद्धा अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडली असून मांडवी जेटीवरून उंच उंच लाटा उसळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची अधूनमधून संततधार सुरू आहे. जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 18.27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड, संगमेश्वर, लांजा राजापूर या तालुक्यांमध्ये 20 मिलीमीटर पेक्षा पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
नाशिकसह मराठवाड्याला मोठा दिलासा..
नाशिक जिल्ह्यात गेल्या 25 दिवसात 104.5 मिलिमीटर सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस बरसलाय तर शहरात देखील 25 दिवसातच 337 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्याचा धरणसाठा गतवर्षीपेक्षा तब्बल 43 टक्केहुन अधिक आहे. आजमितीस धरणसाठा 48.25 टक्के असून गेल्यावर्षी तो फक्त 5.49 टक्के होता. एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे नाशिककर सुखावले असून दुसरीकडे नाशिकहून जायकवाडीला यंदा दोन महिने आधीच साडे सहा टीएमसीपर्यंत पाणी जाऊन पोहोचल्याने मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळालाय.