
पावसाळा सुरू होताच पर्यटन स्थळांचे वेध लागतात. धबधबा, गडकिल्ले, रिसॉर्टवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान यंदा पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची कोसळधार सुरू आहे. दरम्यान निसर्गसंपन्न कोल्हापुरात (Kolhapur Monsoon Tourist Places) पर्यटकांचा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील पर्यटकांचं आकर्षण ठरलेला राऊतवाडी धबधबा कोसळू लागला असून येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी असलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसरात कोसळणार्या सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
गर्द हिरवाई, घनदाट अभयारण्य, हुडहुडी भरवणारी बोचरी थंडी आणि त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. पावसाचे आगर असलेल्या राधानगरीत पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे राऊतवाडी धबधबा कोसळू लागल्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातून कोसळणारे धबधबे, राधानगरी धरण आणि खासकरून राऊतवाडी धबधबा यामुळे घाटातून नजरेच्या टप्प्यापर्यंत पावसाच्या सरीमध्ये ओलेचिंब होण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
नक्की वाचा - Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!
कोल्हापुरातील पावसाळी पर्यटनस्थळं...
- पन्हाळा गड
- मसाई पठार (कोल्हापुरहून ३० किमी अंतरावर असलेलं पठार)
- गगनगड (गगनगिरी महाराजांचं वास्तव्य असलेलं खोल दऱ्या आणि दगडातील नैसर्गिक गुहा)
- गगनबावडा - (गगनबावडा घाट)
- आंबा घाट
- विशाळगड किल्ला
- आजरा तालुक्यात धबधबा
- बर्की धबधबा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world