विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका तरुण विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं मृत महिलेचे नाव आहे. एका महिन्याच्या पोटच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच तिने आपले जीवन संपवल्यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सासरचे लोक हॉल पाहायला गेले अन् घरात घडला अनर्थ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अस्मिता यांच्या अवघ्या एक महिन्याच्या मुलीचा बारशाचा कार्यक्रम नियोजित होता. या गोड कौटुंबिक सोहळ्यासाठी हॉल बुक करण्यासाठी अस्मिता यांचे पती, सासू आणि सासरे घराबाहेर गेले होते. कुटुंबातील सर्व सदस्य हॉल बघण्यासाठी गेले असताना अस्मिता घरी एकट्याच होती. याच वेळी अस्मिताने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
दरवाजा तोडल्यानंतर भीषण वास्तव आलं समोर
काही वेळानंतर पती आणि सासू-सासरे हॉल पाहून घरी परतले. त्यांनी मुख्य दरवाजा ठोठावला असता तो आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच वेळ हाका मारून आणि फोन करूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर अनर्थ घडल्याचा संशय आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये अस्मिता यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
गळ्यावर जखमा; व्हिसेरा ठेवला राखीव
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या गळ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीकरिता व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
संशयास्पद बाबी लक्षात घेता, न्यायाधीश आणि इतर पंचांच्या उपस्थितीतच आज मृतदेहाचे शवविच्छेदन आणि पुढील कायदेशीर पंचनामा केला जाणार आहे. राजारामपुरी पोलीस सासरच्या आणि माहेरच्या लोकांचे जबाब नोंदवून या आत्महत्येमागचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world