प्रतिनिधी, विशाल पुजारी
गेल्या महिनाभरापासून देशातील लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील प्रत्येक सदस्य कामात गुंतलेला आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ गेला महिनाभर हसन मुश्रीफही व्यस्त होते. मात्र 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यात कोल्हापूरातही मतदान पार पडलं. काल हसन मुश्रीफांनी जनतेकडे एक मागणी केली आहे.
मुश्रीफांना पुढील 14 दिवसांची रजा हवी असल्याची मागणी केली आहे. श्रम परिहारासाठी मी इटली आणि स्पेन दौऱ्यावर जाणार असल्याने मला यासाठी रजा द्यावी, याची मागणी केली आहे. या मागणीचा फलक त्यांनी आपल्या घराबाहेर लावला आहे.जिल्ह्यातील दिगज नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ नेहमीच त्यांच्या विविध उपक्रमामुळे चर्चेत असतात. रोज सकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर एक जनता दरबार भरतो. मुश्रीफ जनता दरबारामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून आलेल्या लोकांचं म्हणणं ऐकत असतात. त्यांना मदत करतात. नेहमी जनतेशी संवाद साधत असणाऱ्या या नेत्यांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक मागणी केली आहे. पुढचे काही दिवस ते भारताच्याही बाहेर श्रमपरिहारासाठी जाणार आहेत.
नक्की वाचा - 'प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेच्या दरबारातून इटली आणि स्पेनच्या प्रवासासाठी 14 दिवसांची रजा घेतली आहे. याबाबत त्यांनी जनतेकडे 14 दिवसांची रजा मागितली होता. सूचनेचा फलक त्यांनी कागल येथील निवासस्थानाच्या बाहेर लावल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुश्रीफ यांनी लावलेल्या फलकावर लिहिलं आहे की, 10 मे ते 24 मे या कालावधीत माझा मोबाइल सुरूच राहील. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन करा. पुढे त्यांनी लिहिलंय, आचारसंहितेच्या काळात विकासाची कामं होत नाहीत, त्यामुळे आम्ही बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली आणि स्पेनचा परदेश दौरा 10 मे ते 24 मे या कालावधीत आयोजित केला आहे.
या काळात वैद्यकीय सेवाही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईमधील मंत्रालयासमोर निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केली आहे. मला 14 दिवसांची रजा आपण मंजूर केली. त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. उन्हाळा प्रचंड आहे तरी सर्वांनी आपली काळजी घ्यावी, आपला विश्वासू हसन मुश्रीफ असेही शेवटी म्हटलं आहे. मुश्रीफ यांच्या या फलकानंतर संपूर्ण जिल्हाभर याची चर्चा आहे. लोकसभा मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लावलेल्या फलकांवर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world