विशाल पुजारी, प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. 7 मे रोजी कोल्हापूरमध्ये मतदान होत असून त्याचा प्रचार आता रंगात आलाय. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांचा मागच्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुणी अपमान केला? असा प्रश्न विचारत सामंत यांनी दोन व्हिडिओ सादर केले. त्यांच्या या आरोपामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत आरोप?
उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत राज्यसभा निवडणुकीतील घटनाक्रम सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले. छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचा सन्मान आम्हीही राखतो. मात्र, गादीचा आता सन्मान राखतो असे म्हणणाऱ्यांनीच संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी नाकारल्याचा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.
संभाजीराजे हे ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत ते शिवसेनेचा (त्यावेळच्या) प्रचार करतील. संभाजीराजे यांनी केवळ शिवसेनेचा आदेश मानला पाहिजे. त्यांनी केवळ आणि केवळ शिवसेनेची (त्यावेळच्या) भूमिका मांडली पाहिजे. तसेच, संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे (त्यावेळच्या) नेते हे माझे नेते आहेत, असा ड्राफ्ट बनवण्यात आला होता. मला उमेदवारी द्यायची असेल तर कोल्हापूरमध्ये येऊन द्या, असं सांगून संभाजीराजे बैठकीतून निघून गेले होते, असं सामंत यांनी सांगितलं.
संभाजीराजेंनी या ड्राफ्टमध्ये काही बदल सुचवले होते. मात्र, शेवटच्या बैठकीत, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे अशी अट घालण्यात आली. हा मला आणि संभाजीराजे दोघांनाही धक्का होता. मी त्यावेळी लिहिलेदा ड्राफ्ट इतका मोठा होता की कॉलेजनंतर पहिल्यांदाच मी एवढं लिखाण पानावर केलं असेल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : छत्रपती शाहू महाराज की संजय मंडलिक? कोल्हापूरकरांचं 'यंदा काय ठरलंय'? )
सरड्यासारखे रंग बदलणारे आता छत्रपतींच्या घराण्याबाबत पुळका दाखवत आहेत. (त्यावेळसच्या) शिवसेनेनं संभाजीराजेंना का खेळवून ठेवलं याचं उत्तर द्यावं. संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांनी छत्रपती घराण्याबद्दलचा आदर शिकवू नये. संभाजीराजेंना उमेदवारी द्यावी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. मला त्यांच्याशी बोलण्यात गुंतवून संजय पवार यांना उमेदवारी दिली, असा आरोप सामंत यांनी केला. माझी नार्को टेस्ट करा, असं आव्हानही सामंत यांनी यावेळी दिलं.