पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कोल्हापूर मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांच्या समोर महायुतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडी राजकीय डाव टाकला आहे. मात्र "शाहू महाराज खरे वारसदार नसून दत्तक आहेत", असं वक्तव्य करत संजय मंडलिकांना राजकीय वातावरण तापवलं होतं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडे कोल्हापुरातील महायुती आणि महाविकास आघाडीची सध्याची ताकद किती आहे यावर एक नजर टाकुया.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. मात्र यंदाची निवडणूक बरीच वेगळी आहे. गेल्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे इतर नेते आणि पदाधिकारी यांचा पाठिंबा होता. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते असून त्यांनी शाहू छत्रपती महाराज यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद लावली आहे.
(नक्की वाचा - साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?)
शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांची ताकद
कोल्हापुरातील बड्या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ यांचा समावेश होते. ते संजय मंडलिक यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन मोठ्या नेत्यांच्या मतांचे विभाजन झालं आहे. यंदाच्या निवडणुकीत नेत्यांचा पाठिंबा पाहायचा झाला तर संजय मंडलिक यांच्या पाठीशी अनेक नेते आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समरजीत सिंह घाटगे, आमदार प्रकाश अबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते पदाधिकारी मंडलिक यांच्या पाठीशी आहेत.
तर महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आम आदमी पार्टी, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या नेत्यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर मतदारसंघाचा आढावा घेतला तर कागल, चंदगड, आजरा, राधानगरी हा संजय मंडलिक यांचा बालेकिल्ला आहे. तर शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे करवीर तालुका गगनबावडा तसेच कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहेत.
( नक्की वाचा - शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान! )
2019 च्या निवडणुकीतील निकाल
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी 7 लाख 45 हजार 675 मतं घेतली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेच्या धनंजय महाडिक यांनी 4 लाख 76 हजार 820 मतं मिळवली होती. तर वंचितच्या उमेदवाराने 63 हजार 251 मतं मिळवली होती.
धनंयज महाडिक आणि सतेज पाटील यांच्या घराण्याचा वाद जुना आहे. त्यामुळे आघाडी धर्म बाजूला ठेवून सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' म्हणत संजय मंडलिक यांना ताकद दिली होती. त्यामुळे मंडलिक यांचा विजय सोपा झाला. मात्र सध्या कोल्हापुरातील राजकारण 360 डिग्री फिरलं आहे. आता शिवसेनेत फूट, राष्ट्रवादीत फूट, धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश असे अनेक घटक आहेत, जे महायुतीच्या उमेदवारीचा ताकद वाढवतात.
मात्र कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना आदराचं स्थान आहे. याआधी ते अप्रत्यक्षरित्या कोल्हापूरच्या राजकाणाशी जोडलेले होते. मात्र त्यांनी कधीही थेट निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करताना महायुतीचा कस लागणार, हे नक्की. त्यामुळे या निवडणुकीत शाहू महाराज यांना सहानुभूती मिळू शकते, ही देखील दाट शक्यता आहे.
विधानसभा मतदासंघातील ताकद
करवीर, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. कागल आणि चंदगड हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत. तर राधानगरी मतदासंघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे.
कोल्हापूरमध्ये मतदान कधी?
राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. कोल्हापूर मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world