विशाल पुजारी, कोल्हापूर
सध्या तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळत आहेत. काहीजण भर चौकात फटाक्यांची माळ फोडतात. तर काहीजण जंगी मिरवणूक काढतात. इतकच नाही तर चौकात भाईचा बर्थडे म्हणत गाड्यांवर केप कापतात. पण हा नवीन ट्रेंड एखादं वर्चस्व गाजवण्यासाठी असू शकतो. याच ट्रेंडनुसार केक कापणे कोल्हापुरातल्या एका टोळक्याला महागात पडलं. पोलिसांनी थेट कारवाई करत या टोळक्याची धिंड काढली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केक कापणाऱ्या जर्मनी गॅंग टोळीची धिंड
इचलकरंजी येथील जर्मन गँग टोळीतील काही तरुणांनी शहरातील एका चौकात वाढदिवस साजरा केला. एका दुचाकीवर केक ठेवून जल्लोष केला. या सगळ्या जल्लोषाची एक व्हिडिओ देखील बनवली. मुळताच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जर्मन गँगच्या या वाढदिवसाची चर्चा रंगली. याची माहिती मिळताच पोलिसांनी या टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर जर्मन गँग टोळीतील काही जणांची पोलिसांनी घटनास्थळावर धिंड काढली.
(नक्की वाचा- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण; गज्या मारणे टोळीतील तिघांना अटक)
केक कापणाऱ्या टोळीचा व्हिडिओ
इचलकरंजीतील जर्मन गँग ही टोळी नेहमी चर्चेत असते. याच टोळीतील काही जणांनी एका तरुणाचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. थाटामाटात साजरा केलेल्या वाढदिवसाची व्हिडिओ केली. अनेकांनी भाईचा बर्थडे म्हणत प्रतिक्रियाही दिल्या. या व्हिडिओमध्ये काही तरुण एका दुचाकी जवळ उभारलेले दिसून येतात. एक तरुण केक कापत आहे, या केकवर मॅजिक कॅन्डल पेटवलेली आहे. दुचाकीच्या भोवती उभ्या असलेल्या सात-आठ जणांच्यामध्ये बर्थडे बॉय आहे. बर्थडे बॉयच्या शेजारी उभा असलेल्या एका तरुणाच्या हातात बंदूक सदृश वस्तू दिसून येते. या बंदूक सदृश वस्तूमधून फटाक्यामधील जाळ देखील बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियासाठी बनवलेल्या या व्हिडिओला एक गाणं देखील लावलेलं आहे. 'साम दाम दंड भेद' असे या गाण्याचे बोल आहेत. हा डॅशिंग वाढदिवस व्हिडिओमध्ये खूपच चर्चेत आला.
(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)
या वाढदिवसाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अशा नव्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी हालचाल सुरू केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी संबंधित तरुणांचा शोध घेतला. वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळीतील काही जणांना पोलिसांनी ठाण्यात आणलं. त्यानंतर या सर्वांना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढून समज दिली. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा करणार नाही असं या टोळक्याकडून कबुली घेतली.