विशाल पुजारी, प्रतिनिधी
लग्नाची वरात हा अनेक कुटुंबासाठी मानाचा किंवा प्रतिष्ठेचा सोहळा असतो. अनेकदा यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. कोणी हत्ती-घोडा आणतात तर कोणी बँड-बाजाची मोठी टीमच घेऊन येतात. मात्र कोल्हापुरातून एक अजब वरात निघाली आहे. यामागे कोणताही मानापमान सोहळा नाही तर एका प्रामाणिक कोल्हापुरकरांच्या समस्यांच्या निराकरणाची मागणी लपलेली दिसते. कोल्हापुरातील संकेत जोशी आणि सोनाली नायक यांच्या लग्नाच्या वरातीची संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे. नववधू-वराची आगळीवेगळी वरात पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हत्ती घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात तुम्ही पाहिली असेल. पण कोल्हापुरात एक अजब वरात निघाली आहे. नववधू-वराची ही वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून निघाली. लग्न समारंभ म्हटलं की, बँड बाजा बारात हे नेहमी आकर्षण असतं. पण कोल्हापुरातल्या या नववधू वराने शहरातल्या भर वस्तीत काढलेली ही वरात कोल्हापूरच नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही वरात काढल्याचं सांगितलं जात आहे. या वरातीमुळे कोल्हापूरकर काय करतील याचा काय नेम नाही अशीच काहीशी प्रचिती येत आहे.
कोल्हापूर शहराच्या मुख्य रस्त्यावर अंबाबाई मंदिर परिसरातील महाद्वार रोडवर संध्याकाळी सातच्या सुमारास निघालेली ही लग्नाची जंगी वरात. या वरातीत नवरा आणि नवरी बॉयलरवर बसले होते आणि या बॉयलरला रोड रोलर जोडलेला. डांबरीकरणासाठी वापरली जाणारी ही दोन वाहनं आणि याच वाहनांवरून काढलेली वरात पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
नक्की वाचा - Road Accident : बहुतांश बाईकस्वार हा नियम मोडतात, एक चूक अन् मीरज-कोल्हापूर रस्त्यावर तरुणाचा मृत्यू
कोल्हापूरच्या रस्त्यांची समस्या खूप गंभीर होत चालली आहे. आतापर्यंत अनेक आंदोलने झाली, पण तरीही रस्ते जैसे थे आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच बऱ्याचदा समजत नाही. म्हणूनच कोल्हापुरातल्या या इंजिनियर तरुणाला सासरवाडीने रोड रोलर आणि बॉयलर लग्नात भेट दिला. याच रोड रोलर आणि बॉयलरवरून त्यांनी लग्नाची वरात काढली आहे. आता ही वरात बघून तरी प्रशासन जागे होणार का असा सवाल कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी विविध योजनांच्या माध्यमातून फंड आणला आणि तो खिशात घालून घेतला. लग्नाची ही वरात पाहून तरी हे नेते सुधारतील आणि कोल्हापूरला चांगले रस्ते देतील अशी अपेक्षा कोल्हापुरकरांकडून व्यक्त केली जात आहे.