कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने पावले टाकली आहेत. कोकणातील रेल्वे गाड्यांची क्षमता दुप्पट करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. विशेष म्हणजे, दुहेरीकरणासाठी पुरेशी जागा रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने, प्रस्ताव मंजूर झाल्यास तातडीने दुहेरीकरणाचे काम हाती घेणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
पावसाळ्यात कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो, या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अखंडीत सेवा सुरू ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. यासाठी कोकण रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल, आपत्कालीन तयारी यावर लक्ष केंद्रित असते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना हाती घेण्यात येतात. रेल्वे प्रवासात येणारे व्यत्यय कमी करणे आणि प्रतिकूल हवामानातही गाड्यांचे सुरळीत आणि सुरक्षित संचालन सुनिश्चित करणे यासाठी कोकण रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असते.
रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, रेल्वे मार्गावर चिखल येणे अशा घटना ज्या भागात घडतात त्या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न करून अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांमुळे अशा घटना घडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी अशा 9 ठिकाणी रेल्वेच्या विशेष देखभाल गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे त्वरित आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन तैनात करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी होत असेल, दृश्यमानता कमी झाली असेल तर गाड्या 40 किलोमीटर प्रती तास वेगाने चालवण्यात येतील. ट्रॅकवरील पाण्याची पातळी 100 मिमी पेक्षा जास्त असेल तर पाणी कमी होईपर्यंत रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.