Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची सत्वपरीक्षा! KYC साठी डोंगर चढण्याची वेळ

राज्य सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे खर्डी खुर्द येथील महिलांची मोठी अडचण झाली आहे. गावात चांगली सुविधा नसल्याने महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावे लागते आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

Nandurbar News: लाडकी बहीण योजनाचा फायदा घेण्यासाठी महिलांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नर्मदा काठावरील धडगाव तालुक्यातील खर्डी खुर्द गावातील महिलांना तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. योजनेसाठी अनिवार्य असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांना दररोज एक मोठी परीक्षा द्यावी लागत आहे. गावात नेटवर्क उपलब्ध असूनसुद्धा, इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने 'लाडक्या बहिणीं'ना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी डोंगरावर चढाई करावी लागत आहे.

राज्य सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे खर्डी खुर्द येथील महिलांची मोठी अडचण झाली आहे. या प्रक्रियेसाठी मोबाईल नेटवर्क व जलद इंटरनेट आवश्यक असते. परंतु गावात चांगली सुविधा नसल्याने महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावे लागते आहे. विशेष म्हणजे, टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिलांना कल्पक उपाययोजना करावी लागते. सिग्नल मिळून ई-केवायसी पूर्ण होईल या आशेने, महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात. एका बाजूला मोबाईल झाडावर आणि दुसऱ्या बाजूला नेटवर्क मिळण्याची वाट पाहत महिला तासनतास बसून असतात, जेणेकरून त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येईल.

खर्डी खुर्द येथील महिला डोंगरावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या समस्या कमी होत नाहीत. टेकडीवरही नेटवर्क कधी गायब होते, तर कधी सरकारी वेबसाईट चालत नाही, अशा तक्रारी महिलांनी केल्या आहेत. ई-केवायसीसाठी नेटवर्क आणि वेबसाईट दोन्ही व्यवस्थित असणे आवश्यक आहे, पण अनेकदा एकाच वेळी दोन्हीपैकी काहीतरी बिघडलेले असते.

समजा, कधी सरकारी वेबसाईट सुरू झाली तरी OTP वेळेवर येत नाही, ज्यामुळे महिलांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींच्या या दुष्टचक्रामुळे अनेक महिलांना निराश होऊन परत यावे लागते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेली ही प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी, नेटवर्कच्या अडचणीमुळे ती एक मोठी परीक्षाच ठरली आहे. सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ घेताना अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर यावर सरकारने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article