
lalbaugcha raja visarjan controversy : यंदा विविध कारणांनी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल 33 तास लागले. 12 तास राजाला समुद्रकिनाऱ्यावरच थांबावं लागलं. आधुनिक तराफा आणि समुद्राला आलेली भरती यामुळे राजाच्या विसर्जनात अनेक विघ्न आले. बाप्पाच्या विसर्जनात लालबाग राजा मंडळाकडून कोळी बांधवांना डावललं गेल्याचाही आरोप करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणात आता मंडळाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
लालबागचा राजा मंडळ कोळी बांधव हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाडकर यांनी खोटी माहिती पसरल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबागचा राजाचे विसर्जन रविवारी विलंबाने झाले. मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली असं मंडळाचे म्हणणं आहे.
नक्की वाचा - Lalbaugcha Raja Visarjan 2025 Controversy:लालबागचा राजाच्या विसर्जनावेळी मंडळाकडून मोठी चूक? पुन्हा मंडळ वादात
त्यामुळे वाडकर यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. लालबागचा राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियात उलट सुलट चर्चा सुरु होत्या. यावेळी लालबाग राजाच्या मंडळावर निशाणा साधण्यात आला होता. मंडळाकडून सर्वसामान्यांना दिली जाणारी वागणूक, कोळी बांधवांना डावलणं याची परिणती चौपाटीवर घडल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये कोळी बांधव हिरालाल वाडकर यांचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरला. अनेक माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिले आणि गणित चुकले, असे त्यांनी सांगितले. यावर मंडळाने प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचे हे म्हणणे खोटे असल्याचं सांगितलं. वाडकर यांचा लालबागचा राजा मंडळाशी काहीही संबंध नाही. कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केलेले नाही. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्याविरोधात मंडळाने हायकोर्टात अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजाच्या विसर्जनाचा तराफा ठाण्याच्या कंपनीचा?
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा अत्याधुनिक तराफा दाखल करण्यात आला होता. हा तराफा गुजरातच्या कंपनीने तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हा तराठा ठाण्याची कंपनी शॉफ्ट शिपयार्ड ने बनवला आहे. जुना तराफाही याच कंपनीने बनवला होता, असं मंडळाकडून सांगितल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world