Investment Advice Land vs. SIP : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे घर घ्यावं की जमीन की आणखी काही असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. मात्र तुमच्याकडील संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी गुंतवू नये असं सांगितलं जातं. त्यात SIP चा पर्यायही आहे. मात्र याबाबत नेमकी माहीत नसल्यामुळे अनेकजण एफडीपर्यंत सीमित राहतात. यासाठी तुम्ही अर्थतज्ज्ञाचा सल्ला घेतला तर फायदेशीर ठरू शकतो.
जमीन की SIP कशात गुंतवणूक कराल?
ही कहाणी आहे दोन मित्रांची. एक समीर आणि दुसरा राकेश. २०२६ मध्ये दोघांचं वय २५ वर्षे होतं. दोघं एकाच कंपनीत काम करीत होते. दोघांचे पगारही जवळपास सारखेच होते. भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाचं असल्याचं दोघांनाही मान्य होतं. मात्र दोघांचाही गुंतवणुकीचा मार्ग वेगवेगळा होता. समीर याला वाटत होतं की, जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जमिनीतून चांगला फायदा मिळतो असं त्याचं निरीक्षण होतं. यासाठी शहरापासून लांब विविध विकास कामं येऊ घालत आहेत, अशा ठिकाणी समीरने १० लाखांत एक जमीन खरेदी केली. येत्या काळात तिथे नवीन प्रकल्प येतील, रस्ते येतील त्यामुळे जमिनीच्या किमती वाढतील यावर त्याचा विश्वास होता.
समीर की राकेश कोण सर्वाधिक श्रीमंत?
दुसरीकडे राकेशचा विश्वास कम्पाऊडिंगवर होता. त्याने नियमित २० हजारांची SIP करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षात शेयर बाजार कोसळला, त्यामुळे राकेशला काही काळासाठी नुकसान सहन करावं लागलं. मात्र तरीही त्याने एसआयपी सुरू ठेवली. त्यात कोणताही खंड आणू दिला नाही. तर समीरच्या जमिनीची किंमत वाढत होती. २०३१ मध्ये म्हणजे ५ वर्षांची समीरच्या जमिनीची किंमत १५ लाखांपर्यंत पोहोचली होती. दुसरीकडे राकेशची नियमित एसआयपी सुरू होती. दहा वर्षांनी समीरच्या जमिनीची किंमत २२ ते २५ लाखांपर्यंत पोहोचली. पाहता पाहता २० वर्षे झाली. यानंतर समीर आणि राकेश पुन्हा एकदा भेटले. २० वर्षांनंतर समीरच्या जमिनीची किंमत जवळपास ६७ लाखांवर पोहोचली होती. ही एक मोठी रक्कम होती. राकेशने जेव्हा म्युचुअल फंड स्टेटमेंट उघडलं तर समीरला धक्काच बसला. राकेशने पुढील २० वर्षे दरमाह २० हजार रुपये गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्याची एकूण गुंतवणूक ४८ लाख इतकी झाली होती. मात्र कम्बाऊडिंगमुळे त्याचा पोर्टफोलियो जवळपास २ कोटींच्या घरात गेला होता. जिथं २० वर्षांनंतर समीरकडे ६७ लाखांची जमीन झाली होती, दुसरीकडे राकेशकडे तब्बल दोन कोटींची संपत्ती झाली होती. याचा अर्थ जमिनीतील गुंतवणूक चुकीची असं म्हणता येऊ शकत नाही. मात्र जिथं विकासाची कामं होणार असतील उदा. रस्ते, औद्योगिक भाग, विमानतळ अशा जवळच्या जमिनीची किंमत कमी काळात चांगली वाढते. एसआयपीची ताकद म्हणजे कमी रकमेत गुंतवणूक सुरू करू शकता. नियमित केल्यास चांगला फायदा मिळू शकतो. मात्र शेयर मार्केट गडगडला तर काही महिने किंवा वर्षभरासाठी तुमचा पोर्टफोलियो तुटवड्यात जाऊ शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )