
त्रिशरण मोहगावकर, लातूर
Latur News : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न मिळाल्याने एका मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. उपचारादरम्यान त्या वडिलांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात ही घटना घडली. देविदास पांचाळ हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा चाकूर येथील एका कॉलेजमध्ये शिकत आहे. मुलाने वडिलांकडे कॉलेज फीसाठी पैशांची मागणी केली. त्याच दिवशी गावात जोरदार पाऊस झाल्यामुळे घरात स्वयंपाकाचा गॅस संपला होता आणि घरात ठेवलेले पैसे गॅस आणण्यासाठी वापरले. त्यामुळे घरात पैसे शिल्लक नव्हते. देविदास यांनी मुलाला पैसे नसल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
रागाच्या भरात बापावर हल्ला
वाद वाढत असताना रागाच्या भरात मुलाने देविदास पांचाळ यांच्या डोक्यात काठीने वार केला. हा हल्ला पाहून त्यांच्या पत्नीने, म्हणजे मुलाच्या आईने, मुलगा आणखी मारेल या भीतीने देविदास यांना घरात कोंडून कडी लावली. नंतर, त्यांना बाहेर काढून उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान देविदास पांचाळ यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हिंपळनेर गावात हळहळ व्यक्त केली जात असून, गरिबीमुळे कुटुंबावर आलेल्या या संकटावर दुःख व्यक्त केले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world